तब्बल ४ महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा करत भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये ही स्पर्धा भरवली आहे. गेल्या १२ वर्षांत संपूर्ण जगभरात आपलं स्थान निर्माण केलेल्या आयपीएलचे चाहते बॉलिवूडमध्येही आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफही त्यापैकीच एक. अनेकदा कतरिना कैफला आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या सामन्यांना हजेरी लाऊन त्यांना चिअर करताना पाहिलं आहे. काही वर्षांपूर्वी फरार उद्योगपती विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थसोबत कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात कतरिना क्रिकेट खेळणं खूप मिस करत आहे. कतरिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात बॅट घेऊन क्रिकेटसाठी सज्ज झालेला एक फोटो टाकला आहे.

दरम्यान आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवली जाण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी २००९ साली दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ साली सुरुवातीचे काही सामने हे युएईमध्ये खेळवण्यात आले होते. यानंतर यंदाचा हंगाम करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे युएईला हलवण्यात आला आहे.