कतरिनाचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही. काही दिवसांपर्यंत ती पत्रकार आणि प्रसार माध्यमांसोबत हसत खेळत वागताना दिसत होती. आपल्या वाढदिवसादिवशी तर तिच्या पार्टीच्या ठिकाणी उभे असणाऱ्या माध्यमांतल्या लोकांना जेवणही दिले होते. पण यावेळी तिला विमानतळावर पाहून मीडिया अवाकच झाले. कतरिना लंडनला जाण्यासाठी निघाली. पत्रकारांना कळले की ती लंडनला जाणार आहे म्हणून छायाचित्रकार तिची विमानतळावरची छबी घेण्यासाठी मुंबई विमानतळावर येऊन थांबले होते. कतरिनाचे काही फोटो आणि मुलाखत मिळेल यासाठी तिथे अनेक पत्रकार आणि छायाचित्रकार येऊन थांबले होते. पण घडले मात्र वेगळेच.

कतरिना मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर तिने प्रसार माध्यमांच्या लोकांना तिची वाट बघत असताना पाहिले तर ती तिच्या गाडीतून बाहेर आलीच नाही. तिने आपल्या सुरक्षा रक्षकांनाही सांगितले की जोवर पत्रकार तिथून जात नाहीत तोवर ती गाडीतून बाहेर येणार नाही. एकवेळ अशी आली की ती तिचे ठरलेले विमान सोडायलाही तयार झाली होती. काही झाले तरी तिला माध्यमांच्या समोर यायचे नव्हते.

कतरिना तेव्हाच गाडीतून उतरली जेव्हा तिला माध्यमांची माणसं जाताना दिसली. ती गाडीतून निघाल्यावर त्वरीत कॅमेऱ्याकडे न बघता आत निघून गेली. कदाचीत कतरिनाला बार बार देखोच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारले जातील किंवा तिच्या आणि रणबीरच्या प्रेमसंबंधांवर काही प्रश्न विचारले जातील याची भिती वाटत असेल, म्हणून कदाचित ती माध्यमांपासून पळण्याचा प्रयत्न करत होती. या प्रश्नांशिवाय सलमान खानसोबतचा ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाबद्दलही माध्यमं काही प्रश्न विचारतील ज्यांची उत्तरं तिला द्यायची नसतील म्हणूनही ती माध्यमांपासून दूर जात असावी. पण प्रश्नांपासून पळण्यापेक्षा त्यांचा सामना करणं केव्हाही चांगलंच नाही का?