‘एका म्यानात दोन तलवारी कधीच राहू शकत नाहीत.. ’ असा एक हमखास टाळ्या मिळवून देणारा संवाद हिंदी चित्रपटांमधून अनेकदा ऐकवला गेला आहे. बॉलिवूडमध्ये राहून गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्री कतरिना कैफनेही हा संवाद नुसताच ऐकला नसेल तर त्यातला सूचक अर्थही नीट लक्षात घेतला असेल बहुधा.. म्हणूनच तिची बहिण इझाबेला हिचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असताना तिने बॉलिवूडमध्ये येऊ  नये, असाच सल्ला तिला कतरिनाने वारंवार दिला आहे. बहिणीचा बॉलिवूड प्रवेश आपल्यासाठी त्रासदायक ठरेल म्हणूनच कतरिनाने असा पवित्रा घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कतरिनाने स्वानुभवावरून बहिणीला हा काळजीचा सल्ला दिल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे.
कतरिनाची बहीण इझाबेला चित्रपटक्षेत्रात येण्यास उत्सुक आहे. खासकरून बॉलिवूडपटांमध्ये तिला जास्त रस असल्याने तिच्या बॉलिवूडप्रवेशाची नांदी कधी होणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. इझाबेला ‘डॉ. कॅबी’ या इंडोकॅनेडियन चित्रपटातून अभिनयाचा श्रीगणेशा करते आहे. इझाबेलाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल मी खूप उत्सुक आहे, असे म्हणणाऱ्या कतरिनाने तिला हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला आहे.
कतरिनाच्या या भूमिकेबद्दल सध्या फारच चर्चा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत टॉप अभिनेत्रींमध्ये कतरिनाची गणना होते. इझाबेला बॉलिवूडमध्ये आली तर ही समीकरणे बदलतील, या भीतीमुळे कतरिना बहिणीला बॉलिवूडमध्ये येण्यापासून रोखते आहे, असे बोलले जात आहे. इझाबेलाला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या सलमान खानने तर टोरंटोमध्ये नुकत्याच झालेल्या ‘डॉ. कॅबी’ चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात बहिणीने बॉलिवूडमध्ये यावे, अशी कतरिनाची इच्छाच नाही, असे सांगत जाहीर टीकाही केली. मात्र, इझाबेलाला हा सल्ला काळजीपोटी दिला असल्याचे कतरिनाने सांगितले.
इझाबेलाची चित्रपट कारकीर्द कशी असेल, याची मलाही उत्सुकता आहे. मात्र, हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे तिच्यासाठी सोपे नाही आहे. इथे काम करताना संस्कृतीपासून ते मुळात तुमची ‘हिंदी’ भाषा चांगली असणे या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. आणि हिंदूी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, इथल्या कामाच्या पद्धतीशी जुळवून घेणे, स्पर्धा-टीका या सगळ्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही मनानेही तितकेच खंबीर असले पाहिजे. इझाबेलाला या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच हिंदी चित्रपटांत काम करावे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे कतरिनाने सांगितले.
इतके हिंदी चित्रपट केल्यानंतर आणि टॉपची अभिनेत्री म्हणून लौकिक कमावल्यानंतर खुद्द कतरिनालाही अजून ‘हिंदी’वर प्रभुत्व नसल्याने टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे आपल्या पदरी असलेल्या या अनुभवावरूनच कतरिनाने बहिणीला हा शहाणपणाचा सल्ला दिला आहे.