सेलिब्रिटी म्हणजे नेमके कोण हा खरे तर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्यांना समाजात एक विशेष स्थान असतं, त्यांच्या जीवनशैलीबाबत जनतेच्या मनात नेहमीच कुतूहल असतं. सुरुवातीला वृत्तपत्रे, नियतकालिके  आणि वृत्तवाहिन्या यांतून येणाऱ्या बातम्या, फोटो आणि मुलाखती यांतून सेलेब्रिटींची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचायची. परंतु, आज ट्विटर, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांमुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील अंतर फार कमी झाले आहे. आज चाहते थेट आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी संपर्क साधून हवे ते प्रश्न त्यांना विचारतात आणि सेलिब्रिटी देखील तितक्याच आवडीने त्यावर प्रतिक्रिया देतात. परंतु, अचानक झालेल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या साक्षात्कारामुळे अधिकाधिक फॉलोअर्स जमा करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. आणि या स्पर्धेत पॉपस्टार केटी पेरी पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल १०० दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स असणारी केटी पेरी ही समाजमाध्यमांच्या इतिहासातील पहिली व्यक्ती आहे.

ट्विटरने स्वत: एका व्हिडीओद्वारे केटीचे अभिनंदन केले आहे. नऊ वर्षांपूर्वी तिने ट्विटर खाते सुरू केले होते. सुरुवातीला लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यानंतर स्वत:ची अर्धनग्न छायाचित्रे, राजकीय नेत्यांवरील टीका अशा करामतींतून तिने लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधले. पुढे खासगी आयुष्यातील अनेक चित्रफिती अपलोड केल्या. साहजिकच तिच्याबद्दल चर्चा वाढली. ज्याची चर्चा अधिक त्याची लोकप्रियता अधिक आणि ज्याची लोकप्रियता अधिक त्याचे फॉलोअर्स अधिक हे घट्ट समीकरण झाले आहे. आता या स्पर्धेत जस्टिन बिबर ९७ दशलक्ष फॉलोअर्स आणि हेलर स्विफ्ट ८५ दशलक्ष फॉलोअर्स यांना मागे टाकून केटी पेरी ट्विटरवर नंबर वन ठरली आहे.