कोणत्याही चित्रपटातील गाणी हा त्या चित्रपटाचा आत्मा समजला जातो. चित्रपटाच्या लोकप्रियतेत या गाण्यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे आपल्याकडे मराठी, हिंदूी किंवा अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटात गाणी ही असतातच. गाणी हा चित्रपटाचा एक भाग असतो, पण एखाद्या संपूर्ण चित्रपटात गाणी हेच त्याचे बलस्थान असेल तर? सध्याच्या काळात तसे करणे कदाचित धाडसाचे ठरेल; पण ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटात तसे घडलेले आहे. या चित्रपटात एक, दोन, तीन नव्हे, तर तब्बल २१ गाणी असून ती सर्व शास्त्रीय रागांवर आधारित आहेत.चित्रपटात इतकी गाणी असण्याचे हे काही पहिले उदाहरण नाही फक्त ‘कटय़ार’मधील सर्व गाण्यांचा बाज वेगळा आहे हे विशेष. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातही मोठय़ा संख्येत गाणी होती आणि ती असणेही स्वाभाविक होते. संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे एक साक्षीदार असलेले गायक व अभिनेते बालगंधर्व यांच्या जीवनावरच तो चित्रपट असल्याने ही गाणी, नाटय़पदे त्यात येणार हे नक्की होते. ‘नटरंग’ या चित्रपटातही बऱ्यापैकी गाणी/लावण्या होत्या. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातही लावण्या खूप होत्या. ‘पिंजरा’मधील गाणी इतक्या काळानंतरही लोकांच्या अजून ओठावर आहेत. आपल्याकडील अन्य विषयांवरील चित्रपटातही गाणी असतातच. मग ‘कटय़ार’सारख्या चित्रपटात ती नसती तरच नवल.पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित व दिग्दर्शित आणि पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जाते. पं. वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर यांसारखे कलाकार नाटकात होते. पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांची ‘खाँसाहेब’ ही भूमिका पं. चंद्रकांत लिमये, चारुदत्त आफळे आणि अगदी अलीकडे वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल यांनीही साकारली. नव्या संचात आजही या नाटकाचे प्रयोग होत असतात. नाटकातील ‘घेई छंद मकरंद’, ‘सुरत पिया की’, ‘या भवनातील गीत’, ‘तेजोनिधी लोहगोल’ आणि अन्य गाणी आजही रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहेत.‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाची कथा आहे पंडित भानुशंकर आणि खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या दोन संगीत घराण्यांतील संघर्षांची. कला मोठी की कलाकार, गायन की घराणे महत्त्वाचे या प्रश्नांचा वेधही या नाटकाने घेतला होता.योगायोग असा की, ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे यांनीही या नाटकात काम केले आहे. सुबोध भावे यांना गायक शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, महेश काळे या मित्रांमुळे शास्त्रीय संगीताची गोडी लागली. शास्त्रीय संगीत मनाला आत्मशांती देणारे आणि आत्मशोध घेणारे आहे. या संगीतातून निर्मळ आनंद मिळतो, असे सुबोध भावे यांचे मत आहे.हा चित्रपट ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित असून नाटकातील पात्रे आणि गाभा घेऊन चित्रपट फुलवला आहे. चित्रपटाच्या संहितेनुसार जी नाटय़पदे आवश्यक होती ती या चित्रपटात आहेतच, पण चित्रपटासाठी म्हणून काही नवीन गाणीही खास तयार केली आहेत. यातीलच एक ‘सूर निरागस हे’ हे गाणे असून कव्वाली, शंकरावरील एक गाणे यांचाही त्यात समावेश आहे. नाटकातील जी नाटय़पदे चित्रपटात घेतलेली आहेत, त्याच्या मूळ चालीला कुठेही धक्का लावलेला नाही. ती तशाच प्रकारे फक्त वेगळ्या प्रसंगात पाहायला, ऐकायला मिळतील. मुळात अभिषेकी बुवांचे संगीतच सक्षम असल्याने नाटकातील नाटय़पदांची लोकप्रियता अद्याप टिकून आहे. त्यामुळे ‘कटय़ार’ चित्रपटाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांचे असले तरी चित्रपटाच्या श्रेयनामावलीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांचे नाव संगीत दिग्दर्शक म्हणून आम्ही ठेवले असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले.‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट संगीतप्रधान असून चित्रपटातील प्रमुख नायक ‘संगीत’ हाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात उत्तम गायक हे अभिनय करायचे आपण पाहिलेले आहे. बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, पं. राम मराठी, पं. वसंतराव देशपांडे आणि इतरही काही मंडळी आहेत. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटासाठी मला अभिनेता नको होता, तर संगीत हाच ज्याचा श्वास आहे, जो संगीत प्रत्यक्ष जगतोय आणि जो पडद्यावर संगीतातील ते भाव जिवंत करेल, अशी व्यक्ती, कलाकार मला हवा होता. शंकर महादेवन हे मला ‘पंडितजी’ या भूमिकेसाठी योग्य वाटले. ते भूमिकेला न्याय देतील याचा विश्वास होता म्हणून त्यांची निवड केली, असेही भावे म्हणाले.‘कटय़ार काळजात घुसली’सारखा संगीतप्रधान चित्रपट ही काळाची गरज आहे. ‘संगीत’ माणसामाणसांमधील भेद, द्वेष नष्ट करते. तेवढे सामथ्र्य संगीतात आहे. सध्याच्या दूषित वातावरणात शास्त्रीय संगीत हे माणसाला आणि त्यांच्या मनाला शुद्ध करेल, असे वाटते. शास्त्रीय संगीतामुळे जो आनंद मला मिळाला तो चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही नक्कीच मिळेल, असा विश्वासही सुबोध भावे यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला.

खॉंसाहेबांच्या भूमिकेत सचिन!
रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकात ‘खॉसाहेब’ही भूमिका पं. वसंतराव देशपांडे यांनी तर ‘पं. भानूशंकर’ ही भूमिका भार्गवराम आचरेकर यांनी केली होती. ‘कटय़ार’या चित्रपटात या दोन्ही भूमिका अनुक्रमे अभिनेते सचिन पिळगावकर (खॉंसाहेब)आणि गायक शंकर महादेवन (पंडित भानूशंकर)करत आहेत. सचिन पिळगावकर ‘कटय़ार’च्या निमित्ताने ते पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘कटय़ार ..’ चित्रपटात सुबोध भावे ‘सदाशिव’ची भूमिका करतो आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ‘झरिना, मृण्मयी देशपांडे ‘उमा’, अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘कविराज’च्या भूमिकेत आहेत. हिंदीतील अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटात ‘खॉंसाहेब’ यांच्या पत्नीच्या म्हणजेच ‘नबील’च्या भूमिकेत आहेत. मूळ नाटकात हे पात्र नाहीये. ‘कटय़ार’ चित्रपटाच्या निमित्ताने त्या पहिल्यांदाच मराठीत येत आहेत. आपल्या परिचयाच्या असलेल्या ज्या कलाकारांना प्रेक्षकांनी आत्तापर्यंत वेगळ्या भूमिकेत कधीही पाहिलेले नाही, ते कलाकार ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचेही सुबोध भावे यांनी सांगितले. एस्सेल व्हिजन आणि श्री गणेश मार्केटिंग अ‍ॅण्ड फिल्म्स निर्मित हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.