संगीत क्षेत्रातील दोन तालेवार घराणी आणि त्यांच्यातील संघर्ष मांडणारे पिढय़ान्पिढय़ा लोकप्रियता टिकवलेले संगीत नाटक ‘कटय़ार काळजात घुसली’ आता चित्रपट रूपात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून नव्या भूमिकेत दिसणार आहे. रंगभूमीवरच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणून ओळखले जाणारे हे नाटक नव्या संचात रंगभूमीवर आणले गेले आणि त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाच्या रूपाने लोकप्रिय झालेले शास्त्रीय संगीत चित्रपट माध्यमातून नव्या पिढीसमोर यावे, या हेतूने चित्रपटासाठी प्रयत्न केल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले.
पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे, लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर अशा दिग्गज आसामींच्या प्रतिभेतून जन्माला आलेले हे नाटक आजही रसिकांवर गारूड करून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. नाटकातून जे शास्त्रीय संगीत लोकांच्या मनाला भावले तेच आता चित्रपटातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी चित्रपटाची कल्पना मांडली. गेले दीड वर्ष या चित्रपटासाठी अथक मेहनत घेतली, असे सुबोध भावे यांनी सांगितले. ‘एस्सेल व्हिजन’ आणि ‘श्रीगणेश मार्केटिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या त्यात मुख्य भूमिका आहेत. ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाला लाभलेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे अजरामर संगीत हेच या चित्रपटाचेही वैशिष्टय़ ठरणार असून पंडित शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, सावनी शेंडे यांच्या आवाजात चित्रपटासाठीची गाणी स्वरबध्द होणार आहेत. हिंदीतील ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘साँवरिया’ सारख्या चित्रपटांचे पटकथा लेखक प्रकाश कपाडिया या चित्रपटासाठी पटकथा लेखन करणार असून मराठी चित्रपटांसाठी पटकथालेखनाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.