‘कौन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन हे आजच्या घडीला एक घट्ट समीकरण झालं आहे. त्यामुळे या शोच्या अकराव्या पर्वातही सूत्रसंचालक म्हणून अमिताभ त्याच उत्साहाने प्रेक्षकांसमोर आले आहेत. मात्र जेव्हा या शोचं सूत्रसंचालन करण्याविषयी पहिल्यांदा त्यांना विचारणा झाली तेव्हा ते लगेचच तयार झाले नव्हते. त्या काळात अमिताभ यांचे चित्रपट रुपेरी पडद्यावर सपशेल आपटले होते. नेमकं काय करायचं, याबद्दल स्पष्टता नसताना या शोसाठीचा निर्णय घेणंही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. मुळातच चित्रपट यशस्वी होवोत किंवा न होवोत, त्यांच्यासारख्या महानायकाने टीव्हीवर काम करू नये, असाच सल्ला त्यांना कुटुंबीयांकडून आणि परिचितांकडून मिळाला होता, असं खुद्द अमिताभ यांनी या शोच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकण्याचं स्वप्न सर्वसामान्यांना दाखवणारा आणि त्याची पूर्ती करणारा हा शो टेलिव्हिजनवर २००० साली दाखल झाला. तेव्हापासून आजवर या शोचे प्रदर्शक बदलले. आधी ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हा शो प्रसारित होत होता. २०१० मध्ये तो ‘सोनी टेलिव्हिजन’कडे आला. वेळोवेळी या शोमध्येही अनेक बदल करण्यात आले. शोमधून मिळणारी रक्कमही वाढत गेली. पण केबीसीशी सूत्रसंचालक म्हणून जोडलं गेलेलं अमिताभ बच्चन यांचं नाव आजही कायम आहे. १९ वर्षे  आणि अकरा पर्व या शोशी आपण जोडले गेलो आहोत. मात्र त्याची सुरुवात योगायोगानेच झाली होती, असं अमिताभ यांनी सांगितलं. सगळीकडेच अपयश चाखायला मिळालेलं असताना टीव्हीसारखं तुलनेने नवं माध्यम आणि नव्या संकल्पनेचा शो करणं घरच्यांना फारसं पटत नव्हतं. त्यामुळे टीव्ही न करण्याचा सल्लाच आपल्याला मिळाला होता, असं ते म्हणाले. अमिताभ यांच्याशिवाय हा शो होऊच शकत नाही, असा निर्धार असलेल्या शोच्या कर्त्यांकरवित्या टीमने अखेर त्यांना लंडनमध्ये मूळ ब्रिटिश शो दाखवण्यासाठी नेल्याचं त्यांनी सांगितलं.

केबीसीचा प्रस्ताव घेऊन निर्माते जेव्हा माझ्याक डे आले तेव्हाची परिस्थिती थोडी कठीण होती. मात्र त्यांच्याकडे या शोचं एक निश्चित स्वरूप होतं, त्यांची एक यंत्रणा होती. या शोची ही यंत्रणा, हा शो कसा आयोजित केला जातो ते पाहायला मिळेल का, अशी विचारणा मी त्यांना केली. आणि आम्ही इंग्लंडला गेलो. तिथं हा शो प्रत्यक्ष कसा केला जातो, कसा चित्रित होतो, त्याचा सेट हे सगळं पाहिलं. त्या सेटवर जे वातावरण होतं ते तसंच मला मिळेल का? तो तसाच माहौल असेल तर मी हा शो करू शकेन, असं त्यांना सांगितलं. आणि आजपर्यंत त्यांनी मला त्याच पद्धतीने हा शो दिलेला आहे, असा केबीसीच्या शुभारंभापासूनचा अनुभव अमिताभ यांनी सांगितला. या शोमध्ये निर्मात्यांनी वारंवार बदल केले, त्यामुळेच त्याचं स्वरूप निश्चित असूनही त्यात प्रेक्षकांना वेगळेपणा अनुभवता आला, असंही ते म्हणाले. हा शो अमिताभ यांनी घेतला तेव्हा ते ५७ वर्षांचे होते आणि आज ७६ व्या वर्षीही ते त्याच उत्साहाने हा शो करत आहेत. हे माझं काम आहे आणि ते मला केलंच पाहिजे. उलट, मी वेगवेगळ्या प्रकारचं काम करत राहिलं पाहिजे, हा माझा आग्रह असतो. आणि जोपर्यंत आपण प्रत्येक जण जिवंत आहोत तोवर प्रत्येकालाच चांगलं काम मिळवण्यासाठी, ते त्याच पद्धतीने करण्यासाठी झगडत राहिलं पाहिजे, असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.