सध्याचा लोकप्रिय आणि तितकाच चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी).’ या शोच्या माध्यमातून बॉलिवूडचे बिग बी, अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता या शोमध्ये कर्मवीर स्पेशल एपिसोड दाखवण्यात येणार आहे. या एपिसोडमध्ये राजस्थानमध्ये राहणाऱ्या रुमा देवी यांना बोलवण्यात आले आहे. सोनी टीव्हीने या एपिसोडचा प्रमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रुमा देवी या राजस्थानमधील ग्रामीण विकास चेतना संस्थान नावाच्या स्वयंसेवी संस्थेत काम करतात आणि त्यांनी राजस्थानमधील २२००० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रुमा देवी यांच्या या कौतुकास्पद उपक्रमासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले होते.

रुपा देवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा केबीसीमध्ये खेळणे थोडे कठिण झाले होते. म्हणून या स्पर्धेसाठी त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची पार्टनर म्हणून निवड केली आहे. रुपा देवी सोनाक्षी सिन्हासोबत हॉट सीटवर बसून कौन बनेगा करोडपती खेळणार आहेत.

पहिल्यांदा रुपा देवी यांना केबीसीमधून फोन करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी तो फेक कॉल म्हणून कट केला. त्यामुळे केबीसी आयोजकांची तारांबळ उडाली असल्याचे म्हटले जात आहे. सतत येणाऱ्या फोनमुळे त्यांनी कौन बनेगा करोडपती आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना त्यांची करोडपती स्पर्धेसाठी निवड झाल्याचे कळाले. रुपा अखेर त्यांचे वडिल आणि स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या १० महिलांसोबत शोमध्ये पोहोचल्या. दरम्यान त्यांनी राजस्थानमधील रोजगाराची परिस्थीती, महिलांना मिळणारी वागणूक सांगितली आहे.