तीन वेगवेगळ्या घराण्याच्या गायकीचा आविष्कार आणि समृद्ध करणारे व्हायोलिनवादन असा श्रवणानंद सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये गुरुवारी रसिकांनी अनुभवला असला तरी युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मैफलीची मोहिनी अद्भूततेचा आनंद देणारी ठरली. कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाची मैफल सुरू होत असताना मंडपामध्ये पाऊल ठेवायला जागा उरली नव्हती.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या दमदार गायनाने झाला. माळवा प्रांतातील लोकधूनवर आधारित पं. मुकुल शिवपुत्र यांची रचना सादर करून त्यांनी रसिकांनाजिंकले. कलाश्री फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित घटकातील आणि दिव्यांग मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या कला रामनाथ यांच्या व्हायोलिनवादनाने रसिकांना संपन्नतेचा अनुभव दिला. माणसाच्या आयुष्यातील स्वरांचे, संगीताचे स्थान आपण जाणतो आणि या मुलांच्या कानावर अभिजात स्वर पडले तर त्याचे आयुष्य फुलून येईल, अशी भावना कला रामनाथ यांनी व्यक्त केली. हा महोत्सव म्हणजे कंठसंगीताचे पीठ आहे, अशा शब्दांत गौरव करून कौशिकी चक्रवर्ती यांनी या स्वरमंचावर बसणे हाच माझ्यासाठी गुरुजनांचा आशीर्वाद आहे, अशी भावना व्यक्त केली. तब्बल अकरा वर्षांनंतर या स्वरमंचावर आलेल्या कौशिकी यांच्या मैफलीची रसिकांवर मोहिनी पडली. ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांच्या रससिद्ध गायनाने गुरुवारच्या सत्राची सांगता झाली.
महोत्सवात आज (दुपारी ४)
- गायत्री वैरागकर-जोशी (गायन)
- कुशल दास (सतार)
- सम्राट पंडित (गायन)
- पं. उल्हास कशाळकर (गायन)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2017 3:56 am