गेली अनेक वर्ष अभिनेता अमिताभ बच्चन यांनी चंदेरी दुनियेमध्ये अभिनयाच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला. बिग बी यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले असून वयाच्या ७५ व्या वर्षीही तेवढ्याच उमेदीने ते प्रत्येक भूमिका वठवत असतात. बिग बींनी ज्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर अभिनयाची जादू चालविली त्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही त्यांनी आपली ठसा उमटविला आहे. सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना विशेष भावले होते. त्यामुळे या शोला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर काही काळ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून  या शोमध्ये सहभाग घेण्यासाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

‘केबीसी’च्या १० व्या सत्रासाठी सध्या नावनोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांसाठी दररोज संध्याकाळी ८.३० वाजता सोनी वाहिनीवर एक प्रश्न विचारण्यात येतो. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देणा-या व्यक्तीला केबीसीमध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यानुसार ६ जूनपासून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्याशी संबंधीत एक प्रश्न विचारण्यात आला आहे.

नावनोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सामान्यज्ञानावर भर असलेले प्रश्न विचारण्यात येतात. यातील एका प्रश्नामध्ये ‘अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विवाह कोणत्या देशात झाला’? असा प्रश्न विचारण्यात आला असून या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार पर्यायही देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये  स्पेन, मालदीव, ग्रीस आणि इटली यांची  नावे देण्यात आली आहेत. विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर उमेदवार ९ जूनला रात्री ८.३० वाजेपर्यंत  देऊ शकतात.

दरम्यान, उमेदवारांना प्रश्न विचारण्याची प्रक्रिया ६ जूनपासून सुरु झाली असून ‘जिंदगी के क्रॉसरोड्स’ या शोदरम्यान इच्छुक उमेदवारांना पहिला प्रश्न विचारण्यात आला होता. केबीसी शोच्या माध्यमातून अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे अमिताभ यांचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.