मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ अमिताभ बच्चन यांचा हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. तसेच टीआरपी यादीमध्ये हा शो टॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या केबीसीला तिसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाला एक्सपर्ट सल्ला ही लाइफलाइन घेऊनही हार मनावी लागल्याचे दिसत आहे.

१८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या एपिसोडमध्ये छत्तीसगढचे जालिम साय हे हॉट सीटवर बसले होते. दरम्यान १२ लाख पन्नास हजार रुपयाच्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी एक्सपर्ट सल्ला ही लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र जालिम यांना प्रश्नाचे अचूक उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांना सहा लाख चाळीस हजार रुपयांवर हार मानावी लागली.

बारा लाख पन्नास हजारांसाठी जालिम यांना ‘सर्वाधिक सिने गीत लिहिण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘A- गुलजार, B- जावेद अख्तर, C- समीर आणि D- अंजान’ असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर एका विशेष वेळेमध्ये कोणीही देऊ शकत नाही असे म्हटले जात आहे. कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पाहता सर्वांनाच गुलजार हे उत्तर योग्य असल्याचे वाटेल. पण समीर आणि अंजान या दोन नावांमध्ये देखील गोंधळ होऊ शकतो. कारण गीतकार समीर त्यांचे पूर्ण नाव समीर अंजान असे लिहीतात.

आणखी वाचा : KBC च्या या महिला स्पर्धकावर ८ जणांनी केला होता बलात्कार

जालिम यांनी एक्सपर्ट राहुल देव यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा ‘मला ज्या विषयाची भीता वाटते ते म्हणजे मनोरंजन. पण या प्रश्नाचे अचूक उत्तर गुलजार असावे हा माझा अंदाज आहे’ असे ते म्हणाले. प्रश्नाचे योग्य उत्तर ठाकून नसल्याने जालिम यांनी खेळ सोडावा असे मत राहुल यांनी व्यक्त केले होते.

काय आहे अचूक उत्तर

बॉलिवूडमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणवर गाणी चित्रीत होत होती. त्यातील बहुतेक गाणी समीर यांनी लिहिली आणि गायिली होती. त्यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक गाणी लिहिण्याचा मान समीर यांनी मिळवला आहे.