सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या अकराव्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. २९ नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी केबीसीचा शेवटा एपिसोड प्रदर्शित झाला. या शेवटच्या एपिसोडमध्ये लेखीका, शिक्षण आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या सुधा मूर्ती सहभागी झाल्या होत्या. एपिसोड कर्मवीर एपिसोड होता. म्हणजेच सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना हॉटसीटवर बसण्याची संधी यंदाच्या पर्वात कर्मवीर थीम अंतर्गत देण्यात आली होती. मात्र या भागामध्ये सुधा मुर्तींना केवळ २५ लाखांपर्यंत मजल मारता आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या संदर्भात हा प्रश्न होता.

२५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्या सुधा मुर्ती यांना ५० लाखांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर मात्र देता आले नाही. या प्रश्नाचे उत्तर ठाऊक न सल्याने सुधा यांनी २५ लाख रुपये घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ‘कोणत्या महिला अभिनेत्रीला सलग दोन वर्षे फिल्म फेअरचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता?,’ या प्रश्नाचे उत्तर सुधा यांना देता आले नाही. या प्रश्नासाठी ए) शर्मिला टागोर, बी) कंगना राणावत, सी) काजोल आणि डी) जया बच्चन असे पर्याय देण्यात आले होते. सुधा यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक अंदाज म्हणून त्यांनी सी) काजोल असे उत्तर दिले. मात्र त्यांचा हा अंदाजही चुकला कारण प्रश्नाचे उत्तर होते डी) जया बच्चन. सुधा यांनी दिलेले चुकीचे उत्तर ऐकून अमिताभ यांनी एक मेजेशीर वक्तव्य केले. “घरी जाऊन मला खूप मार खावा लागणार आहे,” असं अमिताभ यांनी सुधा यांचा अंदाज चुकल्यानंतर म्हटलं.

या शेवटच्या भागामध्ये सुधा यांनी अनेक मजेदार प्रसंग सांगितले. तसेच त्यांनी स्वत:चा संघर्षमय प्रवास, त्या समाजसेवेकडे कशा वळल्या याबद्दलही सांगितले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या ११ व्या पर्वामध्ये चार जण करोडपती झाले. यामध्ये सनोज राज, बबिता तावडे, गौतम कुमार झा आणि अजीत कुमार यांचा समावेश आहे.