छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणाऱ्या खेळाडूंनी हजेरी लावली आहे. त्यात भारताचा गोल्डन बॉय आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली आहे. यावेळी श्रीजेशने त्याच्या वडिलांनी त्याच्या किपिंग पॅडसाठी गाय विकल्याचे सांगितले.

अमिताभ यांनी श्रीजेशला एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत श्रीजेशचं संपूर्ण कुटुंब भारतीय हॉकी टीमने ऑल्मिपिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर भावूक झाल्याचे दिसत आहे. यानंतर अमिताभ यांनी श्रीजेशला त्याचे आणि वडिलांचे संबंध कसे आहेत ते विचारले. त्यावर श्रीजेश म्हणाला, ‘मी एका शेतकरी कुटुंबातून येतो. लहान असताना मी खूप मस्ती करायचो आणि माझे वडील मला मारायचे. जी.व्ही. राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये माझी निवड झाली त्या दिवशी, माझ्या वडिलांनी मला विचारले की जर मी हॉकीमध्ये पुढे गेलो तर मला नोकरी मिळेल का? एवढंच नाही तर सगळे लोक बोलायचे की फुटबॉल खेळ किंवा अॅथलेटिक्समध्ये जा कारण केरळमध्ये तेच खेळ खेळले जातात. तिथल्या लोकांना हॉकी बद्दल माहित नाही. मी वडिलांना म्हणालो मला तीन वर्षे द्या मी प्रयत्न करून बघतो. अपयशी झालो तर मी दुसर काही बघेन. त्यानंतर मी हॉकी खेळायला सुरुवात केली आणि गोलकीपर झालो,’ असे श्रीजेश म्हणाला.

आणखी वाचा :  श्रीजेश आणि संपूर्ण भारतीय हॉकी टीमच्या संघर्षाविषयी ऐकून बिग बी झाले भावूक

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

पुढे गोलकीपिंग महाग आहे असं सांगत श्रीजेश म्हणाला, ‘माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितलं की मला पॅड खरेदी करावे लागतील आणि त्यासाठी पैसे पाहिजे. मी शेतकरी कुटुंबातून असल्याने त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितले की माझ्या प्रशिक्षकाने मला पॅड खरेदी करण्यास सांगितले आणि मला पैशांची गरज आहे. माझ्या वडिलांनी मला म्हणाले की बघतो. त्यांनी पैसे पाठवले आणि नंतर माझ्या आईशी बोलत असताना मला कळालं की माझ्या वडिलांनी पॅडसाठ आमच्या कुटुंबासाठी सगळ्यात महत्त्वाची असणारी गाय विकली आहे. ती गाय आमच्या उत्पन्नाचा स्त्रोत होती.’

आणखी वाचा : ‘तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे की…’, बोल्ड ड्रेसने फजिती केल्यानंतर नोरा फतेही झाली ट्रोल

पुढे श्रीजेश म्हणाला, ‘कॅम्पमध्ये लोक मला नावं ठेवायचे की याचे पॅड्स फाटले आहेत. त्याला दोरी बांधली आहे. लोकांनी खूप नावं ठेवली. एकवेळ अशी आली होती जेव्हा मला वाटलं की मी सोडून देऊ. पण मला वडिलांची आठवण आली आणि मी त्या लोकांकडे दुर्लेक्ष केलं आणि आज मी इथे आहे. माझ्या वडिलांना मी कधी काही देऊ शकलो नाही, म्हणून जेव्हा मी ऑल्मिपिकमध्ये पदक जिंकलं तेव्हा सगळ्यात आधी ते पदक मी त्यांच्या गळ्यात टाकलं.’