आपल्या आयुष्यातल्या एखाद्या खास व्यक्तीला आपण विशेष नावाने संबोधत असतो. मग ती खास व्यक्ती तुमची आई असो किंवा बायको प्रेयसी कोणीही असतो. अनेक वेळा आपण या खास व्यक्तीचे फोन नंबरही हटके नावाने मोबाइलमध्ये सेव्ह करत असतो. अलिकडे तरुणाईमध्ये ही हटके स्टाइल फेमस होतीये. त्यामुळेच अनेक जण आपल्या गर्लफ्रेंडचा किंवा बायकोचा नंबर ‘बायको’, ‘होम मिनिस्टर’,’कटकट’ या आणि अशा अनेक नावांनी सेव्ह करतात. विशेष म्हणजे कलाविश्वातही असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या पत्नीचा किंवा गर्लफ्रेंडचा नंबर अशा हटके पद्धतीने सेव्ह करतात. इतकंच नाही तर बॉलिवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनीदेखील जया बच्चन यांचं नाव अशाच वेगळ्या पद्धतीने सेव्ह केलं आहे.

सध्या छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’चं ११ वं पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. या शोमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच आता त्यांनी जया बच्चन यांच्याविषयी एक खुलासा केला आहे. अमिताभ यांनी फोनमध्ये जया बच्चन यांचं नाव ‘जेबी’ असं सेव्ह केलं आहे.

फोनमध्ये जया बच्चन असं संपूर्ण नाव सेव्ह न करता बिग बींनी त्यांचं नाव लहान करत ‘जेबी’ असं लिहीलं आहे. विशेष म्हणजे त्यांची ही संकल्पना उपस्थित साऱ्यांनाच आवडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शोमध्ये स्पर्धकाने त्याच्या पत्नीचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे ते सांगितलं. त्यावर अमिताभ यांनीही जया बच्चन यांचं नाव ‘जेबी’ म्हणून सेव्ह केल्याचं स्पष्ट केलं.