‘केबीसी’च्या हॉट सीटवर एकदा तरी बसायची संधी मिळावी. अमिताभ यांच्या गप्पा ऐकताऐकता प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि त्यांच्याकडून सही केलेला धनादेश स्वीकारत लखपती, करोडपती व्हायची स्वप्ने कित्येकांनी पाहिली असतील, पण हॉट सीटवर बसायची संधी मिळाली तरी आपण अचूक उत्तरे देऊ शकू का? ‘फास्टेस्ट फिंगर’ कमीतकमी वेळात कसे जिंकणार? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर खुद्द सोनी कंपनीनेच दिले आहे. ‘केबीसी’च्या ऑनलाइन खेळावर तुम्ही प्रत्यक्ष हॉट सीटवर बसायची तालीम करू शकता. या महाउपयोगामुळेच ‘केबीसी’चा ऑनलाइन खेळ तीन महिन्यांत ४० लाख वेळा खेळला गेला आहे.
‘क ौन बनेगा करोडपती’ हा इतका प्रचंड लोकप्रिय गेम शो आहे की त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण या शोचे भाग मर्यादित असल्याने एवढय़ा मोठय़ा संख्येने स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकत नाहीत. पण असा ‘केबीसी’चा प्रश्नोत्तरांचा खेळ खेळणाऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून या ऑनलाइन अवताराची निर्मिती केली असल्याचे ‘सोनी एंटरटेन्मेंट’च्या ‘न्यू मीडिया’चे उपाध्यक्ष नितेश कृपलानी यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. तीन महिन्यांत या ऑनलाइन खेळाला मिळालेला ४० लाख लोकांचा प्रतिसाद हा आमचा विजय असल्याचे कृपलानी यांनी सांगितले.
‘केबीसी’चा हा ऑनलाइन अवतार ळँी ङइउरल्ल८.ूे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जगभरातील स्पर्धक हा ऑनलाइन खेळ खेळू शकतात. नेहमीसारखाच एक प्रश्न आणि त्याचे चार पर्याय तुम्हाला समोरच्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात. हॉट सीट आणि अमिताभ बच्चन यांची प्रतिकृतीही तुम्हाला खेळात दिसते. शिवाय प्रत्येक प्रश्नागणीक तुम्ही किती रक्कम मिळवली आणि उत्तर देण्यासाठी किती वेळ घेतलात याचा आलेखही तुम्हाला पाहता येतो. अमिताभ यांचे विचार आणि त्यांच्या कविता ऐकवणारा एक विभाग इथे आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देणारी ‘मेसेज वॉल’ही आहे.
सबकुछ ‘केबीसी’ असलेला हा ऑनलाइन खेळ त्या पद्धतीनेच निर्माण केला गेला असल्याचे कृपलानी यांनी सांगितले. आपल्याला हव्या त्या वेळी, हव्या त्या पद्धतीने आणि अगदी संगणक असो, मोबाइल असो, टॅब्लेट असो एका क्लिकवर हा टीव्हीवरचा खेळ ऑनलाइन खेळता यावा, ही त्यामागची संकल्पना होती. तीनच महिन्यांपूर्वी हा ऑनलाइन खेळ सुरू करण्यात आला होता. अल्पावधीत त्याला जो ‘लाख’मोलाचा प्रतिसाद मिळाला आहे, ते पाहता ऑनलाइनवरही खऱ्या ‘केबीसी’चा अनुभव लोकांना देण्यात आम्हाला यश आले, असे वाटत असल्याचे कृपलानी यांनी सांगितले.