माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. अमिताभ बच्चन आणि शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनामधील संवाद नेहमी चर्चेत असतात. या आधी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल विवेक कुमार हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी २५ लाख रूपये तर जिंकले त्यासोबत त्यांना आणखी एक फायदा झाला आहे.

मंदसौरमध्ये पोस्टिंग असलेले कॉन्स्टेबल विवेक कुमार काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसले होते. शो मध्ये त्यांनी २५ लाख रूपये जिंकले. शो दरम्यान त्यांनी अमिताभ यांना सांगितले की, त्यांची पत्नी देखील कॉन्स्टेबल असून तिची पोस्टींग ही ग्वालियरला असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर अमिताभ हसले आणि म्हणाले की, जे कोणी मोठे अधिकारी हे ऐकत आहात कृपया या दोघांची पोस्टिंग एका ठिकाणी करा.

आणखी वाचा- ‘बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..’ ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न

दरम्यान, विवेक कुमार यांची पत्नी प्रीतीची बदली आता ग्वालियरवरून मंदसौरला करण्यात आली आहे. मंदसौरचे स्थानिक आमदार यशपाल सिंग सिसोदिया यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री आणि डीजीपी यांना विवेकची समस्या दूर करण्यासाठी विनंती केली होती. सोबतच विवेकची पत्नी प्रीतीनेही बदलीसाठी अर्ज केला होता.