मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. ही कारवाई निंदनीय असल्याची भावना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली. ‘सूडाच्या राजकारणात सामान्य मरतो’, असंही ते म्हणाले.

केदार शिंदेंनी ट्विट करत म्हटलं, ‘जे घडलं ते अत्यंत चुकीचं! निंदनीय! या मुंबईमध्ये मी जन्मलो. ही आडवी तिडवी वाढली ती पूर्ण अधिकृत आहे? वर्षानुवर्षे अडचणी जाणवतात. त्याला जबाबदार कोण? मुंबई महापालिकेने मनावर घेतलं असतं तर, याआधीच असंख्य ठिकाणी जेसीबी चालले असते. राजकारण करा पण ते कोणत्याही बाजूने सूडाचं नको. यात सामान्य मरतो.’

केदार शिंदेंनी मुंबई महापालिकेला टॅग करत पुढे ट्विट केलं, ‘बांधकाम अनधिकृत असेल तर, पाडायला हवेच. पण ते बांधकाम बांधताना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना समजलं नाही? मग तेही तितकेच दोषी आहेत. त्यांना तर निलंबित करायला हवं ना? परवानगी दिलीच कशी?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काय आहे प्रकरण?

कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या घरात असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच अशी, अशी विचारणा करत पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली, तर कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.