बऱ्याच अडथळ्यांनंतंर अभिनेत्री सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' शुक्रवारी प्रदर्शित झाला. सारा व सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे आणि या आकड्यानुसार अभिनेत्री जान्हवी कपूरला मागे टाकण्यात सारा अपयशी ठरली आहे. 'बॉक्स ऑफीस इंडिया डॉटकॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार 'केदारनाथ'ने पहिल्या दिवशी ७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे जान्हवीच्या 'धडक' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ कोटी ७१ लाख रुपये कमावले होते. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवी आणि सारामध्ये सुरुवातीपासूनच तुलना होऊ लागली. या दोघींमध्ये कोण वरचढ ठरतंय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 'केदारनाथ' बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरतो का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण तुर्तास, पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत जान्हवीने साराला मागे टाकलंय. वाचा : मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ 'केदारनाथ' या चित्रपटाला देण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूरने केलं आहे. या चित्रपटावर काही धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचाही परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे.