रेश्मा राईकवार

केदारनाथ

चित्रपटाच्या माध्यमातून आपण निवडलेल्या विषयावर थेट भाष्य करणारा दिग्दर्शक असेल तर साहजिकच त्या चित्रपटाकडून मोठय़ा अपेक्षा असतात. ‘कायपोचे’सारख्या चित्रपटातून धार्मिक तेढ प्रभावीपणे रंगवणारा दिग्दर्शक अभिषेक कपूर पुन्हा एकदा समाजात खोलवर रुजलेल्या या धार्मिक, सामाजिक भिंतींच्या मुळापर्यंत जाणार, तेही ‘केदारनाथ’च्या पार्श्वभूमीवर प्रेमकथेच्या आधारे तो हे मांडणार म्हटल्यावर चित्रपटाबद्दलच्या अपेक्षाच हिमालयाएवढय़ा असणार यात शंकाच नाही. मात्र इथे एका मुद्दय़ावर ठाम बोलण्यापेक्षा केदारनाथवर झालेला निसर्गाचा प्रकोप, धार्मिक तेढ, प्रेमकथा अशा सगळ्याच प्रवाहांत अडकलेली अभिषेक कपूरची कथा  प्रलयात वाहून गेली आहे.

केदारनाथला सातत्याने लागलेली भाविकांची रीघ, तिथे येणारे भाविक आणि त्यांच्यासाठी म्हणून देवाच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यापासून, राहणे, दर्शन, पूजाअर्चा अशा वेगवेगळ्या सोयींच्या निमित्ताने उभी राहिलेली तिथली सामाजिक-आर्थिक घडी अशा अनेक गोष्टी चित्रपटाच्या सुरुवातीलाच कथेच्या ओघात पाहायला मिळतात. वरवर सामाजिक एकोपा आहे, गेली कित्येक वर्षे पंडित आणि मुस्लीम पिठ्ठू (भाविकांना पाठीवर घेऊन जाणारे) आपापले व्यवसाय सांभाळत शांतपणे जगत आहेत. एखादा मुस्लीम तरुण केदारनाथच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचणे हे आजही तितके सहज नाही. एकीकडे पिढय़ान्पिढय़ा एकत्र नांदत असल्याने मुस्लिमांनी देवाला हात जोडले तर ते चालते, ते आपल्या तथाकथित मर्यादांचा भंग करणार नाहीत, याची खात्री असणारी जुनीजाणती पिढी आहे. तर दुसरीकडे त्यांनी आपल्या मशिदीत अल्लाहला पुजावे आणि आमची मंदिरे आम्हीच सांभाळणार अशाच अट्टहासाने वावरणारी नवी पिढी आहे. त्यामुळे जोवर समाजाने आखून दिलेली बंधने पाळत आहेत तोवर शांती नांदते आहे. पंडित मिश्रांची मुलगी मुक्कू ऊर्फ मंदाकिनी (सारा अली खान) पिठ्ठू मन्सूर खानच्या प्रेमात पडते आणि याच शांत वातावरणात ठिणगी पडते.

भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवण्याचा आपला व्यवसाय एखाद्या व्रतासारखा प्रेमाने, सहजतेने करणारा मन्सूर पाहताक्षणी मुक्कूच्या नजरेत भरतो आणि मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुक्कूचे प्रयत्न सुरू होतात. आपण एकत्र येऊ शकत नाहीत, याची ठाम कल्पना असूनही मुक्कूचे प्रेम मन्सूरला तिच्याजवळ आणते. अशा प्रेमकथांमध्ये जो दंगा अपेक्षित असतो तोच इथेही पाहायला मिळतो. हा दंगा फक्त मुक्कू आणि मन्सूरपुरता राहत नाही. तो केदारनाथमधील मुस्लिमांना तिथून कायमचे बाहेर हुसकावून लावू पाहण्याइतका मोठा होत जातो.

प्रेमाच्या ठिणगीने पेटलेला हा धार्मिक वणवा पसरायच्या आधीच तो केदारनाथाच्या मंदिरासारखाच जलप्रलयात वाहून जातो. दिग्दर्शक अभिषेक कपूरला नेमके चित्रपटातून काय दाखवायचे आहे हेच यात स्पष्ट होत नाही. उत्तराखंडमध्ये पाच वर्षांपूर्वी पडलेला प्रचंड पाऊस आणि झालेला जलप्रलय हा ‘केदारनाथ’ या चित्रपटाचा मुख्य धागा आहे. कुठे तरी कथेच्या ओघात केदारनाथमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि या गर्दीला सोयी पुरवण्याच्या निमित्ताने लॉज, हॉटेल्स उभी करत अर्थकारण साधण्याच्या अट्टहासापायी या पर्वतरांगांवर क्षमतेबाहेर वाढलेले, त्यांना न पेलवणारे जनजीवन या विषयालाही दिग्दर्शकाने स्पर्श केला आहे. मात्र तोही अगदी निसटता. त्यावरही दिग्दर्शक सविस्तर प्रकाश टाकत नाही.

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटांची स्वतची अशी एक वास्तववादी शैली आहे जी त्याने याही चित्रपटात जपली आहे, मात्र मुळात कथेतच प्रभावी धागा नसल्याने तो कलाकारांनाही धड पकडता आलेला नाही. सारा अली खान हिचा हा पदार्पणातील चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात ती कमालीच्या सहजतेने आणि प्रचंड विश्वासाने वावरली आहे. साराच्या तुलनेत अनुभवी सुशांत सिंग राजपूत त्याच्या नेहमीच्या गोड अवतारापलीकडे पोहोचलेला नाही. त्यातही चित्रपटात धड प्रेमकथाही नसल्याने त्याला त्यातही वाव मिळालेला नाही.

* दिग्दर्शक – अभिषेक कपूर

* कलाकार – सुशांत सिंग राजपूत, सारा अली खान, नितीश भारद्वाज, सोनाली सचदेव, पूजा गौर, अलका अमिन आणि निशांत दहिया.