अभिनेत्री सारा अली खानचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटावर बंदी घातली नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे असा दावा या पुजाऱ्यांनी केला आहे.

‘हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे. त्यावर बंदी घातली नाही तर आम्ही आंदोलन करू,’ असा इशारा केदार सभा या केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुक्ला यांनी दिला आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ या चित्रपटाला देण्यात आला आहे. यामध्ये सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका आहे. केदारनाथ मंदिराजवळ या चित्रपटातील एका अश्लिल गाण्याचे शूटिंग केले गेले, तेव्हासुद्धा पुजाऱ्यांनी त्याला विरोध केल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

या चित्रपटाविरोधात गुरुवारी रुद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर काही लोकांनी निदर्शनेही केली. ‘केदारनाथ’चा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून या विरोधाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही ट्विट करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना चित्रपटावर बंदी आणण्याची विनंती त्यांनी या ट्विटद्वारे केली आहे.

‘उत्तराखंडच्या महाप्रलयात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. अशा महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मुख्य कलाकार बोल्ड सीन देताना दाखवण्यात आलं आहे. जे अत्यंत चुकीचं आहे. त्याचप्रमाणे टीझरमध्ये हिरो जो मुस्लीम दाखवण्यात आला आहे तो एका हिंदू मुलीला आपल्या पाठीवर वाहून नेताना दाखवण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचं असून केदारनाथच्या ट्रेकिंग मार्गावर कोणताही मुस्लीम व्यक्ती यात्रेकरूंना पाठीवर वाहून नेत नाही,’ असं शुक्ला म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटाच्या ‘प्रेम हीच तीर्थयात्रा’ या टॅगलाइनवरही आक्षेप घेतला आहे.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आधीही बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आता ‘केदारनाथ’च्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.