सैफ अली खानची लाडकी लेक सारा खान लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र चंदेरी दुनियेत येण्यापूर्वीच तिची सर्वत्र चर्चा होत आहे. साराच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत तिचे वडील सैफ अली खान फार उत्सुक होते. सैफची ही उत्सुकता ‘केदारनाथ’ या चित्रपटातून प्रत्यक्षातही उतरणार होती. मात्र साराच्या एका निर्णयामुळे सैफच्या स्वप्नांबरोबरच सारालादेखील  संकटाला सामोरे जावे लागत आहे.

सारा अली खानने अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ हा चित्रपट साईन केला होता. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच साराने ‘सिंबा’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारल्यामुळे केदारनाथच्या निर्मात्यांनी साराला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसीनुसार साराला एकतर केदारनाथचे चित्रीकरण पूर्ण करावे लागेल.तसेच तिने चित्रीकरण करण्यास नकार दिला तर तिला ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

वाचा: ‘रेस ३’ मधलं नवीन गाणं ऐकलंत का ?

 

‘केदारनाथ’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि क्रीअर्ज एंटरटेन्मेंट यांच्यामधील वाद टोकाला गेले होते. या वादामध्येच साराला रोहित शेट्टी यांच्या ‘सिंबा’ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या ऑफरनंतर साराने ‘सिंबा’साठी तिचा होकारही कळविला होता.

साराने केदारनाथ चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी केल्यामुळे तिला चित्रपट करणे बंधनकारक होते. केदारनाथचे चित्रीकरण मे महिन्यात सुरु होऊन ५ जुलैपर्यंत संपणार होते. त्यामुळे साराला या चित्रीकरणासाठी उपस्थित राहणे आवश्यक  होते. मात्र सारा अन्य एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तीने  सांगितले. साराच्या या वर्तनामुळे तिला नोटीस पाठविण्यात आल्याचे केदारनाथच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, साराने केदानाथ चित्रपटाच्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता सारा या नोटीसचे कशाप्रकारे उत्तर देणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.