लवकरच पुस्तक प्रकाशित करणार
संवेदनशील कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या आजोबांच्या कवितांचा ठेवा जपला असून लवकरच या कविता पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचा त्यांचा विचार आहे. मुझ्तार खैराबादी हे अख्तर यांचे आजोबा आहेत. त्यांनी लिहिलेल्या काही कविता व गझल्स जेव्हा आपण वाचल्या तेव्हा लोकप्रिय असलेल्या या ‘नज्म’ आपल्या आजोबांनी लिहिल्या असल्याचे लक्षात आल्याचे ते म्हणाले.जावेद अख्तर हे गेली दहा वर्षे त्यांचे आजोबा खैराबादी यांनी लिहिलेल्या कविता, गझल यावर काम व संशोधन करत आहेत. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या किंवा विस्मृतीत गेलेल्या आजोबांच्या या कवितांवर त्यांनी अभ्यास व संशोधन सुरू केले आणि आजोबांच्या कविता आणि गझलचा हा ठेवा पुस्तक स्वरूपात लोकांपुढे आणण्याचे ठरविले आहे.आजोबांनी लिहिलेल्या कवितांवर अभ्यास आणि संशोधनाचे काम करत असताना जावेद अख्तर यांना ‘ना किसी की आँख का नूर हू, ना किसी के दिल का गुरुर हू’ ही लोकप्रिय असलेली आणि विविध गायकांनी गायलेली गझल सापडली. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या गझलचा कवी कोण हे आतापर्यंत अज्ञात होते. पण सुरू केलेल्या अभ्यासातून आणि संशोधनातून ही गझल माझ्या आजोबांनीच लिहिली असल्याचे आता समोर आले असल्याचे जावेद अख्तर सांगतात.