येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या ‘रंग रसिया’ या हिंदूी चित्रपटावर केरळमधील न्यायालयाने बंदी घातली आहे. १९व्या शतकातील महान चित्रकार राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
रविवर्मा यांच्या नात इंदिरादेवी कुंजमा यांनी अळपुळा जिल्हा न्यायालयात बंदीसाठीची याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने अंतरिम बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. न्यायाधीश प्रसून मोहन यांनी आपल्या आदेशात निर्मात्याला या चित्रपटाचा राजा रविवर्मा यांच्या वैयक्तिक जीवनाशी कोणताही संबंध नसल्याचे सूचना प्रसिद्ध केल्याशिवाय रंग रसिया चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.