प्रसंग कोणताही असो, ज्यावेळी समाजाला आपल्या मदतीची अपेक्षा असते तेव्हा संपूर्ण कलाविश्व यासाठी मोठ्या मनाने पुढे येतं. यातच अभिनेता अक्षय कुमारही काही मागे राहिलेला नाही. देशसेवेत आपल्या प्राणांची आहूती देणारे सैनिक असो किंवा मग त्यांची कुटुंब असो. सर्वांसाठीच खिलाडी कुमारने सढळ हस्ते मदत केली आहे. याचीच प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. केरळच्या पूरात अडकलेल्या आणि या अडचणीच्या प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीला अक्षय धावून गेला असून, त्याने आपली मदत मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यापर्यंत पोहोचवली आहे.

आपण मदत केल्याविषयी त्याने कुठेच वाच्यता केली नसली तरीही दाक्षिणात्य चित्रपट निर्माते- दिग्दर्शन प्रियदर्शन यांचं ट्विट त्याने रिट्विट केल्यामुळे याविषयीची माहिती मिळाली. आपल्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र असल्यामुळे अक्षय स्वत: केरळमध्ये जाऊ शकला नाही. असं असलं तरीही त्याने प्रियदर्शन यांच्याहस्ते आपली मदत देवभूमीपर्यंत पोहोचवली आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना अर्थिक मदतीसाठीचा धनादेश देते वेळचा एक फोटो प्रियदर्शन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी खिलाडी कुमारचा उल्लेख करत केरळ राज्यातील जनजीवन पुर्ववत करण्यासाठी आम्ही योगदान देत आहोत, असं म्हटलं. धर्म, राजकारण या सर्व गोष्टी दूर सारत फक्त माणुसकीच्या नात्याने एकत्र येत केरळवासियांची मदत करा, असं आवाहनही त्यांनी या ट्विटमधून केलं. ज्यानंतरच खऱ्या अर्थाने खिलाडी कुमारच्या दानशूर वृत्तीविषयी पुन्हा प्रचिती आली.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

याआधी अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिनेत्री सनी लिओनी आणि इतरही बऱ्याच कलाकार मंडळींनी केरळच्या पूरग्रस्तांना मदत केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे यातील बऱ्याच कलाकारांनी आपण मदत केल्याची वाच्यताही केली नाही. दरम्यान, विविध मार्गांनी सध्या या राज्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला असून, परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशीच प्रार्थना आणि त्यासाठी प्रयत्न सर्व स्तरांतून करण्यात येत आहेत.