सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचं संगीत अनेकार्थाने श्रोत्यांना आनंद देणारं तर कधी प्रेरणा देणारं ठरतं. सध्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी जगभरातून असंख्य लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातच ए. आर. रेहमान यांनी आपल्या अनोख्या अंदाजात पूरग्रस्तांना परिस्थितीतून सावरण्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे.

केरळच्या नागरिकांना सध्या आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधाराचीही गरज आहे. रेहमान यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून लोकांना तो आधार आणि ती प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅलिफोर्नियातील एका कॉन्सर्टदरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ते ‘मुस्तफा, मुस्तफा’ या गाण्याचे बोल बदलून ‘केरला, केरला डोंट वरी केरला’ असं गाणं गायलं. रेहमानच्या या अनोख्या संदेशाचं कौतुक नेटकरी करत आहेत.

Kerala Floods: अखेर पाऊस थांबला पण…

केरळमध्ये ८ ऑगस्टपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला. आता पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागले आहे. या पुरात २०० हून अधिक जणांचे प्राण गेले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरात जवळपास २० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.