साताऱ्यातील वाई इथं गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाची शूटिंग सुरु होतं. मात्र, शुटिंगदरम्यान सेटला अचानक आग लागल्याने संपूर्ण सेट जळून खाक झाला. सेटवर असलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यताही वर्तविण्यात आली.

मुख्य म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी या चित्रपटाचे चित्रीकरण संपणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा अनुचित प्रकार घडला. परंतु चित्रपटाचे शुटिंग पुन्हा सुरु करण्याचा विचार ‘केसरी’च्या टीमकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा : VIDEO : वडील- मुलीच्या नात्यावर हळुवार फुंकर मारणारे ‘दिलबरो’ गाणे ऐकले?

चित्रपटांच्या गराड्यामध्ये अक्षय कायमच व्यस्त असतो. त्यामुळे कदाचित ‘केसरी’च्या चित्रीकरणासाठी त्याला पुन्हा एकदा बिझी शेड्युल मधून वेळ काढावा लागणार आहे. त्याचप्रमाणे सेटवरच्या अन्य व्यक्तींनाही सहकार्य करावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. खुद्द अक्षय कुमार या चित्रपटासाठी त्याच्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल करुन काही व्यक्तीगत कामांसाठी राखून ठेवलेला वेळ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खर्ची घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खिलाडी कुमारची त्याच्या कामाप्रती असणारी समर्पक वृत्ती दिसून आली आहे.
यंदाच्या वर्षी अक्षय विविध धाटणीच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्या चित्रपटांसाठीही त्याला पुरेसा वेळ द्यावा लागत आहे. पण, सध्या तो ‘केसरी’लाच प्राधान्य देताना दिसतोय.

अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अक्षयकुमारसह परिनिती चोप्रा आणि जतिंदर शहा हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे कथानक १८९७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा आहे. दरम्यान, अक्षयकुमारचा ‘२.०’ आणि ‘गोल्ड’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.