काही प्रादेशिक चित्रपटांमधील कलाकार हे भल्याभल्या बॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकतात. ज्यावेळी शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्याचवेळी ‘केजीएफ’ हा कन्नड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दाक्षिणात्य अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ’ने शाहरुखच्या ‘झिरो’लाही मागे टाकलं होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही आठवड्यांतच २०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटातील नायकाचे वडील हे मात्र आजही बस चालवतात.

यशचे खरे नाव कुमार गौडा. छोट्या पडद्यावरून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये त्याची गणना केली जाते. पैसा, प्रसिद्धी या सर्व गोष्टी त्याला मिळाल्या. पण तरीही यशचे बाबा गावी अजूनही बस चालवतात. त्यांनी हे काम करण्यामागचं कारण ऐकून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल.

बस ड्रायव्हर या कामामुळेच त्यांना मुलाचे स्वप्न पूर्ण करता आले. त्यांच्या या कामामुळेच यश त्याच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकला. त्यामुळे आता यशने जरी पैसा कमावला तरी ज्या व्यवसायाने आपल्याला इतका आधार दिला तो न सोडण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला आहे.

‘बाहुबली’चे दिग्दर्शन एस.एस.राजामौली यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते. पण त्यांनी आपल्या मुलांसाठी जे काही केले, ते ऐकून ते खरे हिरो असल्याची मला जाणीव झाली.