बॉलिवूडमधली स्पर्धा जीवघेणी असते हे वाक्य ऐकून ऐकून गुळगुळीत झाले आहे. मात्र, वास्तवात ती स्पर्धा आहे आणि आता ‘कोटी क्लब’च्या युगात ती अजून ‘गळेकापू’ झाली आहे. सध्या बॉलिवूडच्या ‘खानावळी’त जे रणकंदन सुरू आहे त्यावरून या स्पर्धेची धग समजू शकेल. शाहरूखने जिवाचा आटापिटा करत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला दोनशे कोटींच्याही पुढे नेत नवा रेकॉर्ड केला तेव्हा हा आणखी एक नवा विक्रम.. यापलीकडे खुद्द बॉलिवूडमध्येही फारशी प्रतिक्रिया उमटली नव्हती. मात्र, शाहरूखचा हा नवा रेकॉर्ड सलमान आणि आमिर दोघांच्याही जिव्हारी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे सलमानने आपल्या कामातून शाहरूख, आमिर आणि नव्या रणबीरलाही मात देऊ, असे जाहीर वक्तव्य केले होते. पण, आता सलमानच नाही तर त्याचा खास मित्र म्हणवणाऱ्या आमिरनेही शाहरूखला जाहीर आव्हान दिले असून ‘धूम ३’ प्रदर्शित झाल्यावर पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड आपल्या नावे प्रस्थापित होईल, असा इशारा दिला आहे. १००, २०० ..अशा कोटय़ानुकोटी रेकॉर्डब्रेक कमाईसाठी खानावळीत पुन्हा जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्’सने आत्तापर्यंत २०० कोटींच्याही पुढे कमाई करत रेकॉर्ड केला होता. सलमानने ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’ असे ओळीने चार शंभर कोटींचे हिट दिल्यानंतर मग कुठे त्याला यशराजच्या ‘एक था टायगर’ने हात दिला. आणि तो दोनशे कोटी कमाई करत आमिरच्या पंक्तीत येऊन बसला. मात्र, सलमानच्या या रेकॉर्डचे आमिरला काही वावगे वाटले नव्हते. पण, गेली चार वर्ष आपली बादशाही टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या शाहरूखची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या दोघांचे रेकॉर्ड मोडत पुढे गेली तेव्हा मात्र सलमान आणि आमिर दोघांनीही जाहीरपणे आपली नापसंती व्यक्त केली. एवढेच नव्हे तर एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत ते दोघेही इरेला पेटले आहेत.एरव्ही शांत आणि संयत अभिनेता म्हणून लौकिक मिरवणाऱ्या आमिरनेही ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाबद्दल प्रश्न विचारताच माझा ‘थ्री इडियट्स’चा रेकॉर्ड मोडायला आधीच चार वर्ष लागली आहेत. आता दिवाळीत ‘धूम ३’ प्रदर्शित होईल तेव्हा पुढची चार वर्ष तरी मोडता येणार नाही असा नवा रेकॉर्ड प्रस्थापित झालेला असेल, असे त्याने ठणकावून सांगितले आहे.