भोजपूरी सिनेमाचा स्टार खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांचा मुकद्दर हा सिनेमा सध्या यू-ट्यूब साईटवर ट्रेंड हो आहे. या सिनेमाला वेव म्युझिक नावाच्या एका चॅनलने सात दिवसांपूर्वी अपलोड केला आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये हा सिनेमा ७० लाखपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आला आहे. तर ३० हजारांहून अलिक लोकांनी हा व्हिडिओ लाइकही केला आहे. या सिनेमावर आपली प्रतिक्रिया देताना एका युझरने या सिनेमाची तुलना हॉलिवूडपटांशी केली. अभिनेता पवन सिंहच्या लग्नानंतर भोजपूरी सिनेमांशी संबंधित काही व्हिडिओ ट्रेंडमध्ये यायला सुरूवात झाली होती.

या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर खेसारी लाल आणि राघवानी या दोघांसोबत शमीम खान आणि एजाज खान या कलाकारांचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. शेखर वर्माने या सिनेमाचे लेखन केले असून प्यारे लाल यादव आणि आजाद सिंहने गीतलेखन केले आहे. मधुकर आनंदने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून वसीम एस. खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. खेसारी लाल यादव हा भोजपुरी सिनेमात काम करण्यासोबतच गायन आणि मॉडेलिंगही करतो.

खेसारीने त्याच्या करिअरची सुरूवात मां भेटाई मेला में या सिनेमातून केली होती. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर खेसारीने मागे वळून पाहिले नाही. अवघ्या पाच वर्षांत खेसारी भोजपुरी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता झाला आहे. त्याने आतापर्यंत ‘बलमा बवाली’, ‘भोला के दरबार चली’, ‘देहाती नाचनेवाली’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच टी-सीरीज, अँजल म्युझिक अशा अनेक बॅनर्ससाठी गाणीही गायली आहेत.