News Flash

’खिसा’वर होतोय कौतुकाचा वर्षाव; मराठी कलाविश्वातील दिग्गज म्हणतात…

पाहा, 'खिसा' पाहून सेलिब्रिटींना नेमकं काय वाटलं

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या ‘खिसा’ या मराठी शॉर्टफिल्मची सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचसोबत ही शॉर्टफिल्म आता बॉलिवूडकरांच्याही पसंतीत उतरत असल्याचं दिसून येत आहे. एका ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या ‘खिसा’चे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शन करण्याचा कोणताही अनुभव पाठीशी नसतानाही त्यांनी उत्तमरित्या ही शॉर्टफिल्म तयार केली आणि तिचा नावलौकिक पार सातासमुद्रापार पोहोचला. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी या शॉर्टफिल्मचं कौतूक केलं आहे.

”मुळात राजच्या चित्रांचा मी चाहता आहे आणि जेव्हा मला कळले की राज शॉर्टफिल्म बनवतोय, तेव्हाच मला समजले हे काहीतरी हटके असणार. हा लघुपट मी पाहिला. यात छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत बारकाईने टिपण्यात आल्या आहे. मी राजला तेव्हाच म्हणालो होतो, हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवांत बाजी मारेल आणि तसेच घडले,” असं दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले.त्याचसोबत अभिनेते किशोर कदम यांनीही ‘खिसा’ला शुभेच्छा देत, “हा लघुपट अप्रतिम असून यातील काही दृश्यच शब्दांपेक्षा खूप काही बोलून जातात. पार्श्वसंगीत, छायाचित्रण, चित्रीकरण स्थळ या सगळ्याच गोष्टी लघुपटाला अत्यंत साजेशा आहेत”, या शब्दांत कौतुक केले आहे.

”एक शिक्षक म्हणून मी राजची शॉर्टफिल्म पाहिली आणि मी त्यातून एकही चूक काढू शकलो नाही. ज्वलंत विषय असतानाही खूप वेगळ्या पद्धतीने तो हाताळण्यात आला आहे. कलाकारांनीही त्यांच्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. छोट्या कॅमेरावर आणि नैसर्गिक प्रकाशात चित्रित झालेली ही शॉर्टफिल्म खरोखरच पुरस्कारांसाठी पात्र आहे.” अशी प्रतिक्रिया सिनेमॅटोग्राफर महेश अनेय यांनी दिली. याव्यतिरिक्त ॲड गुरु रवी देशपांडे, सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग, चित्रपट समीक्षक अशोक राणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘खिसा’चे भरभरून कौतुक केले आहे.

”जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जेव्हा मी प्रवेश घेतला, तेव्हापासून मला फिल्ममेकरच व्हायचंय हे मी मनाशी ठाम ठरवलं होतं. कॉलेजमध्ये असतानाच मी प्रादेशिक सिनेमांचा अभ्यास सुरु केला होता. एफटीआयला जायचंच आहे या उद्देशाने मी फोटोग्राफी या विषयासाठी प्रवेश घेतला होता. हे करत असताना चित्रकार होण्याचेही डोक्यात होतेच. कारण अनेकांकडून माझी चित्रे वेगळी असतात, या प्रतिक्रिया यायच्या. एनएसडीचे माजी संचालक इब्राहिम अलकाझी यांनीही माझे काम बघून मला पत्र लिहिले होते. त्या पत्रामुळे माझी चित्रकार होण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली. तरीही फिल्ममेकिंगचं वेड माझ्या रक्तात भिनलं होते. मी एफटीआयला प्रवेश परीक्षा पास झालो मात्र दुर्दैवाने प्रवेशाला मुकलो. अशा वेळी एक दिशा निवडणे गरजेचे होते. मग मी चित्रकार होण्याचे ठरवले. चित्रकारितेत नाव कमावल्यानंतर आता पुन्हा माझ्यातील फिल्ममेकिंग मला शांत बसू देत नव्हता. त्यामुळे मी पुन्हा माझ्या स्वप्नांचा माग घेऊ लागलो. त्यातून ‘खिसा’चा जन्म झाला. ही शॉर्टफिल्म म्हणजे माझ्या चित्रकारितेचा विस्तार आहे, असे मी समजतो,” असं म्हणत दिग्दर्शक राज मोरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

पुढे ते म्हणतात, “माझ्या चित्रांमध्ये जसे आजूबाजूच्या परिस्थितीचे दर्शन घडते , त्याप्रमाणेच अलिकडच्या काळात घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींची कथा यात सांगण्यात आली आहे. आजही समाजात जात आणि धर्माला विशेष महत्त्व दिले जाते. एकंदरच आपण इतिहासावर अनेकदा भाष्य करतो. आपण नेहमीच आपल्या महापुरुषांनी दिलेल्या शिकवणीचा वापर आपल्या स्वार्थी गरजांसाठी केला आहे आणि ‘खिसा’ची कथा याच मुद्द्यावर प्रकाश टाकणारी आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 9:06 am

Web Title: khisa marathi movie marathi celebrities a shower of appreciation ssj 93
Next Stories
1 दीपिकाने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सुरु झाली दीप-वीरची लव्हस्टोरी
2 अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल
3 अक्षय कुमारचे बँक खाते आणि अमिताभ याच्या कपाटातील कपड्यांवर ‘या’ अभिनेत्याची नजर
Just Now!
X