‘अर्जुन रेड्डी’ या सुपरहिट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला. यामध्ये शाहिद कपूर व कियारा अडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर ‘अर्जुन रेड्डी’ या भूमिकेमुळे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. ‘कबीर सिंग’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजयने कियारासाठी भेटवस्तू पाठवली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजय-कियाराच्या रोमान्समुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनी नुकतंच एका तेलुगू जाहिरातीत एकत्र काम केलं. त्याचाच हा व्हिडीओ आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत हे दोघं एकत्र दिसले होते. त्यावेळी या जाहिरातीची शूटिंग सुरू होती. या जाहिरातीत दोघांचाही पारंपरिक पोशाख पाहायला मिळत आहे. विजयने निळ्या रंगाचा कुर्ता व सोनेरी रंगाची धोती तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. चाहत्यांना या दोघांनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री पसंत पडली असून अनेकांनी या दोघांना एकत्र काम करण्याचाही सल्लाही दिला आहे.

Video : अरेरे! करीनाबद्दल बोलताना आलियाच्या तोंडून निघाली शिवी

विजयचा ‘डिअर कॉम्रेड’ हा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर ‘कबीर सिंग’नंतर कियाराच्या हातात बरेच चित्रपट आहेत. ‘लक्ष्मी बाँब’, ‘शेरशाह’, ‘गुड न्यूज’, ‘इंदू की जवानी’ असे कियाराचे लागोपाठ चार चित्रपट आहेत. ‘एम.एस. धोनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कियारा ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आली.