बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ बॉलीवूडमधील एण्ट्रीसाठी सज्ज झाला असून, त्याच्या चित्रपटाबाबतची उत्सुकता सर्वांना आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आपल्या आगामी चित्रपटात इशान आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा हिला लाँच करणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. इशान एक अभिनेता म्हणून कसा आहे हे जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता आहेच, पण शाहिदप्रमाणे इशानलाही नृत्याची खूप आवड आहे. खुद्द शाहिदनेच इशानच्या नृत्य कौशल्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे. शाहिद म्हणाला की, इशान हा खूप चांगला डान्सर आहे. खरंतर तो माझ्यापेक्षाची चांगला नाचतो.

वाचा: शाहिदच्या संगीत समारंभात इशानने केली धमाल

इशान बॉलीवूडमध्ये कोणासोबत एण्ट्री घेणार? याबाबत शाहिदला विचारले असता त्याने उत्तर देणे टाळले. इशानच्या पदार्पणाबाबतच्या प्रश्नांवर मी प्रतिक्रिया देण्यासाठी अधिकृत व्यक्ती नाही. याचा संपूर्ण अधिकार चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता याचा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना घोषणा केव्हा करायची ते ठरवू द्या, पण इशानला चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो, असेही शाहिद पुढे म्हणाला.