आज असे अनेक सिनेमे आहेत ज्यांचे संगीत श्रोत्यांच्या मनात चिरतरुण आहे. जे पुढच्या पिढ्यांपर्यंत आपसूक पोहोचत असते. संगीत क्षेत्रात अनेक नामवंत जोड्या आहेत ज्यांची गाणी सहज आपल्या ओठी येतात. कल्याणजी -आनंदजी, लक्ष्मीकांत – प्यारेलाल, शंकर-जयकिशन, जतिन-ललित, साजीद-वाजीद, विशाल-शेखर ते मराठीतील आघाडीचे अजय-अतूल अशी अनेक नावं आग्रहाने घेता येतील. पण संगीत क्षेत्रात अशीही एक जोडी आहे जी एकमेकांच्या सोबती पेक्षा वैयक्तिकरित्या प्रेक्षकांच्या अधिक ओळखीचे आहेत. बहुतेक हिच त्यांची खासियत असावी. ती जोडी म्हणजे मिलिंद इंगळे आणि किशोर कदम यांची. उत्तम गायक, संगीतकार म्हणून मिलिंद परिचित आहेत तर एक परिपक्व अभिनेता आणि कवी म्हणून किशोर कदम प्रसिद्ध आहेत. मात्र या जोडीने दिलेला ‘गारवा’ आजही प्रेक्षकांना सुखावून जातो. ‘माहेरचा निरोप’, ‘मोकळा श्वास’, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या काही निवडक सिनेमासाठी त्यांनी एकत्र केलेलं काम अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नुकतेच त्यांनी हिंदी सिनेमात पहिल्यांदा जोडीनेच पदार्पण केले आहे. संगीत दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून मिलिंद आणि किशोर यांचा डॉटर हा हिंदी सिनेमा २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे के. पाश या नव्या नावाने किशोर कदम यांनी हिंदीत पहिले पाऊल टाकले आहे. याबाबत मिलिंद म्हणतात, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेपासून सुरु झालेल्या आमच्या मैत्रीचा सिलसिला आजही तसाच चालू आहे. आमच्या या ३० वर्षांच्या मैत्रीचं आम्हा दोघांना खूप कौतुक आहे. किशोरच्या मराठीतील कविता अप्रतिम आहेच मात्र त्याने हिंदीतही यावं अशी माझी खूप इच्छा होती जी डॉटरच्या निमित्ताने पूर्ण झाली. आमच्यातील छान टयुनिंगमुळे अपेक्षित असलेल्या शब्दांच नेमकं गाणं मला मिळालं आणि पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या. म्हणूनच की काय या सिनेमातील सुफी प्रकरचं गाणं इतकं अप्रतिम आणि काळजाला भिडणारं झालंय जे नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेईल.