गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मत; पंचम-निषादची ‘आठ प्रहर कॉन्सर्ट’ येत्या रविवारी

भारतीय शास्त्रीय संगीत हे निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गानेच हे सूर निर्माण केले असून त्या सुरांचा आदर करणे आणि निसर्गाच्या मर्यादेत राहून आणि निसर्गाच्या नियमांनुसारच भारतीय संगीतात प्रहराची संकल्पना आहे. ही संकल्पना जपत श्रोत्यांना आवडणारी गोष्ट देण्यापेक्षा कलाकाराने श्रोत्यांना हिताची गोष्ट द्यायला हवी, असे मत ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी व्यक्त केले. पंचम-निषाद या संस्थेतर्फे येत्या रविवारी षण्मुखानंद सभागृहात सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १.३० वाजेपर्यंत १९ तास १९ कलाकार ‘८ प्रहर कॉन्सर्ट’ सादर करणार आहेत. या मफिलीचा समारोप किशोरी आमोणकर यांच्या गायनाने होणार आहे.

भारतातील निसर्गाचा, ऋतुचक्राचा आणि समयचक्राचा विचार करून शास्त्रीय संगीतातील सहा मुख्य रागांची आणि ३६ रागिणींची निर्मिती झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून संगीत हे साधनेपेक्षा पसा मिळवण्याचे साधन बनत गेल्याने यातील निसर्गाचा, ऋतुचक्राचा आणि समयचक्राचा भाग मागे पडत गेला आहे. आपण आता परदेशी समयचक्राप्रमाणे राग आळवतो. मग त्याचा यथोचित परिणाम कसा होणार, असा प्रश्नही किशोरीताईंनी उपस्थित केला. मात्र या मफिलीच्या माध्यमातून आठ प्रहरांची अस्सल भारतीय रचना जगापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. भारतीय शास्त्रीय संगीताचा मूळ उद्देश ऐकणाऱ्याला आणि गाणाऱ्यालाही मन:शांती मिळवून देणे, हा आहे. मात्र आज संगीतातील धांगडिधगा ऐकला की, खरेच मन:शांती मिळते का, हा प्रश्न मनात येतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आजकालचे कलाकार रागाच्या गर्भाशी जाऊन तादात्म्य पावण्यापेक्षा कलाकुसर करण्यातच धन्यता मानतात. आता एखाद्या मफिलीला गेल्यावर एखाद्या तरी तरुण कलाकाराने आपल्या डोळ्यांत पाणी आणावे असे वाटत राहते. पण एकही तसा तयारीचा कलाकार समोर दिसत नाही, ही खंत आहे. आजकालचे कलाकार साधनावर प्रभुत्व मिळवून साध्य विसरतात. त्याऐवजी प्रत्येक रागाचा पाय धरून त्याला शरण यायला हवे. आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितले होते की, श्रोत्यांना हित दे, प्रिय नको! म्हणजेच श्रोत्यांना काय आवडते, याच्यापेक्षाही त्यांच्या हिताचे काय आहे, हे त्यांना ऐकवायला हवे. लोकांना संगीत ऐकून शांत वाटायला हवे, हेच कलाकाराचे यश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचम-निषादतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी सहा वाजता पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनाने होणार असून त्यानंतर एन राजम, उल्हास कशाळकर, राशीद खान, राजन व साजन मिश्रा, सतीश व्यास, अश्विनी भिडे-देशपांडे, देवकी पंडित, विश्वमोहन भट्ट, बुधादित्य मुखर्जी, संजीव अभ्यंकर, जयतीर्थ मेवुंडी, अमान व अयान अली खान, दिलशाद खान, गुंडेचा बंधू आणि किशोरी आमोणकर हे कलाकार सहभागी होणार आहेत.

  • समयचक्रातील पहिल्या प्रहरातील पहिला राग म्हणजे विभास! सूर्य अजूनही उगवला नसतो, मात्र त्याची प्रभा आसमंतात असते. तो सूर्याचा होणारा भास, त्याची उत्सुकता याचा परिपाक या विभासमध्ये आहे. वास्तविक कोणताही राग म्हणजे भाव असतो. आणि प्रत्येक रागात निसर्गाच्या बदलणाऱ्या अवस्थेमुळे होणाऱ्या सुरांच्या बदलांचे निरूपण असते. निसर्गाचा भाव बदलतो तसतसे स्वर आणि मानवी भावही बदलत जातात. दुपारच्या वेळी आपली अवस्था खूप अस्वस्थ असते. एक प्रकारची काहिली होत असते. निसर्गातही असेच होत असते. अशा वेळी शुद्ध मध्यम असलेले मध्यमप्रणीत राग गातात. याचे मुख्य कारण म्हणजे सा-रे-ग-म-प-ध-नी या सात स्वरांच्या मधला स्वर म्हणजे ‘म’! हा मध्यम म्हणजे सप्तकाचा आत्मा आहे. सा-रे-ग आणि प-ध-नी या तीन तीन स्वरांच्या समूहात समतोल साधणारा हा स्वर या सप्तकाला शांत करतो. त्यामुळेच हा मध्यमप्रणीत राग दुपारच्या वेळी गातात, असे सांगत त्यांनी समयचक्र, प्रहर आणि रागांची गुंफण यांचा परस्परसंबंध समजावून सांगितला.
  • संगीत हे अत्यंत अमूर्त आणि अतक्र्य आहे. राग म्हणजे इच्छा असून मनातील भाव अत्यंत टोकाला जात नाही, तोपर्यंत सूर उमटत नाहीत. विशेष म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत या सात सुरांपर्यंतच मर्यादित नसून दोन सुरांच्या मधल्या श्रुती दाखवण्याचे कामही हे संगीत करते. निसर्गाच्या जवळ जाण्याचे काम संगीत करत असते. त्यामुळे कोणताही राग गाताना अजूनही दडपण वाटते. किशोरी आमोणकरांनी विभास चांगला गायला, असे सांगणारे लोक भेटले की खूप वाईट वाटते. यापेक्षाही ‘विभास काय मस्त दिसला’ अशा प्रकारची प्रतिक्रिया आली की तो कोणी गायला यापेक्षाही विभास राग उठून दिसतो. ही खरी पावती वाटते, असेही त्या म्हणाल्या.