काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी २’ या शो प्रवास चांगल्याचं रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. घरामध्ये नवनवीन टास्क रंगू लागले आहेत. या टास्कमध्ये काही जण एकमेकांची साथ देताना दिसतायेत तर काही जणांमध्ये वाद होताना दिसत आहेत. घरात नुकत्याच रंगलेल्या चोर बाजार या टास्कनंतर किशोरी शहाणेंनी सर्वांची मनं जिंकली आहेत. या टास्कनंतर इतर सदस्यांशी गप्पा मारताना त्यांनी बिग बॉस मराठीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. ‘वूट’वरील अनसीन अनदेखा व्हिडिओत हे पाहायला मिळतं.

पराग कान्हेरे आणि वीणा जगतापसोबत किशोरी शहाणे गप्पा मारत असतात. त्यावेळी त्या सांगतात, ‘मला मेसेज आला की तू बिग बॉस मराठीत स्पर्धक म्हणून जाऊ इच्छितेस का? मला आश्चर्याचा धक्काच बसला. कुटुंबीयांना सांगितलं तेव्हा तेसुद्धा आश्चर्यचकीत झाले. बिग बॉसच्या घरात खूप टास्क असतात. तिथले स्पर्धक सर्वांसमोर बरंवाईट बोलतात. पाठीमागे कोण काय बोलेल सांगता येत नाही, असं सगळं ते मला समजावून सांगत होते.’

हे ऐकून वीणा म्हणाली, ‘तुमचं आणि शिवानीचं झालेलं भांडण आणि त्यानंतर तुमचं रडणं कुटुंबीय जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना अजून काळजी वाटेल.’ यावर किशोरी शहाणे यांनी सांगितलं, ‘माझ्या कुटुंबीयांना सांगा की मी ठीक आहे असं मी कॅमेरासमोर बोलले. नाहीतर ते सगळे बिग बॉसच्या ऑफीसमध्ये फोन करतील आणि मला घरी पाठवण्यास सांगतील. कारण त्यांनी मला कधी रडताना पाहिलंच नाही.’

वेगवेगळे स्वभाव असणाऱ्या व्यक्तींसोबत १०० दिवस एकाच घरात राहणं सोपी गोष्ट नाही. मात्र बिग बॉसच्या घरामध्ये साऱ्याच सदस्यांना येथे रहायचं असेल तर एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घेणं भाग आहे. टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते. पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद झाला. वादानंतर किशोरी शहाणेंना अश्रू अनावर झाले.