‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या पहिल्याच शोने कपिल शर्मा नामक विनोदवीराने एकाच वेळी वाहिनीच्या निर्मात्यांना आणि बॉलीवूडच्या सिताऱ्यांना आपलंसं केलं. कपिलचा शो लोकप्रिय झाला आणि सातत्याने नंबर वन राहिल्याने ‘कलर्स’ या वाहिनीचा तो चेहरा ठरला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग याच शोच्या माध्यमातून बॉलीवूडजनांच्या चित्रपटाची प्रसिद्धी करत त्यांची विनोदी हजेरी घेत त्यांच्यामध्येही त्याने स्थान मिळवलं. त्यामुळे अल्पावधीतच कपिल शर्माला बॉलीवूडचं आवतन आलं नसतं तरच नवल! आपला शो की चित्रपट?, या द्वंद्वात अडकलेल्या कपिलला यशराजच्या तीन चित्रपटांची संधी सोडावी लागली. मात्र, प्रसिद्ध दिग्दर्शकद्वयी अब्बास-मस्तान यांच्यामुळे कपिल शर्मा हे नाव पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
‘किस किस को प्यार करूँ ’ या चित्रपटातून कपिल शर्मा बॉलीवूडमध्ये प्रवेश करतो आहे. पहिल्याच चित्रपटात चार नायिकांबरोबर काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. म्हणजे, तीन पत्नी आणि एक प्रेमिका यांच्यात अडकलेल्या तरुणाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा काहीशी जुनी म्हणजे गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या शैलीतील होती, असं वाटत नाही का?, यावर आपल्याला सध्याचे जे चित्रपट पाहतो आहोत त्यात उलट अशा चित्रपटांची कमी आहे. त्यामुळे, या चित्रपटाची कल्पना नवीन वाटल्याचे कपिल शर्माने सांगितले. मुळात, अब्बास-मस्तान यांनी चित्रपट सोपवतानाच त्याची स्पष्ट कल्पना दिली होती, असे कपिलने सांगितले. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’चे चित्रीकरण थांबवणे किंवा त्यात काही तडजोड करून चित्रपटासाठी वाहिनीने परवानगी दिली नाही. त्यामुळे माझी तीन चित्रपटांची संधी हुकली. मग कधीतरी अब्बास-मस्तान यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ते माझ्या शोचे खूप चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्याच वेळी एक कथा आमच्याकडे खूप दिवस पडून आहे. मात्र, त्यासाठी आम्हाला विनोदाची अचूक जाण, टायमिंग असलेला असा अभिनेता हवा होता. तू या कथेला न्याय देऊ शकशील, असं आम्हाला वाटतंय. विचार करून बघ, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांना जर माझ्यावर विश्वास वाटतो आहे तर मी ही संधी का सोडायची?, असा विचार करून या चित्रपटाला होकार दिल्याचे कपिलने सांगितले.
आजवर ‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर कपिलने अनेक तारे-तारकांना व्यवस्थित सांभाळलंय मग पहिल्याच चित्रपटात चार नायिकांशी मिळून मिसळून काम करणं सहज शक्य झालं असेल.. यावर चार नायिका म्हणजे तीन पत्नी आणि एक प्रेमिका ही संकल्पना चित्रपटाच्या कथेतच खूप मस्त बांधली आहे. त्यामुळे प्रत्यक्षातही चारजणींबरोबर काम करतानाचा अनुभव एकदम छान होता, असे कपिल म्हणतो. म्हणजे गावाकडून आलेला हा तरुण ज्याचं नावही आईने ‘शिव राम किशन’ असं ठेवलं आहे. जेणेकरून तो कुठलीही गडबड करणार नाही. तो मुंबईत येऊन मोठा उद्योगपती बनतो आणि तेच ‘उद्योग’ करण्याच्या नादात इच्छा नसतानाही तो तीन बायकांचा नवरा होतो. शिवाय, त्याची प्रेमिका असते ती वेगळीच. मग कुणाचेही मन न दुखावता त्यांना सांभाळून घेण्यासाठी त्याला काय कसरत करावी लागते, हा अनुभव चित्रपटानेही दिला आणि प्रत्यक्षात या चार अभिनेत्रींनाही न दुखावता त्यांच्याबरोबर काम करताना तो अनुभव कामीही आला, असे कपिल चेष्टने सांगतो. अब्बास-मस्तान यांनी आजवर विनोदी चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. ही दिग्दर्शक जोडी थरार, वेगवान कथानक आणि रहस्यपटांसाठी प्रसिद्ध आहे. थरारपटांसाठी प्रसिद्ध असले म्हणजे ते विनोदी चित्रपट दिग्दर्शित करूच शकत नाही, असा विचार का करायचा?, कपिल आपल्यालाच सवाल करतो. ते दोघेही नावाजलेले दिग्दर्शक आहेत. आपली कथा पडद्यावर कशी रंगवायची?, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे मग कथा विनोदी आहे की रहस्यमय आहे याने फरक पडत नाही. लोकांना त्यांचा हाही चित्रपट आवडेल, असा विश्वास कपिलने व्यक्त केला.
‘कॉमेडी नाइट्स..’कडून लक्ष हलवता येणार नाही. कारण, या शोमुळे लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्याचमुळे एवढी प्रसिद्धीही मिळाली. आता हो शो जबाबदारीनेच केला पाहिजे, ही भावना सतत मनात असते, असे कपिल म्हणतो. या शोमुळे आर्थिक स्थैर्य मिळालं आहे आणि त्यामुळे आता जे योग्य वाटतील तेच चित्रपट करण्याचा पर्याय, स्वातंत्र्य मिळालं आहे. तेच जास्त महत्त्वाचं आहे. ‘किस किस को प्यार करूँ’ या चित्रपटाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे, त्यावरून पुढची वाटचाल निश्चित होईल. पण, तोपर्यंत ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शोही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा राहील, असे कपिलने सांगितले.

मध्यंतरी अब्बास-मस्तान यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ते माझ्या शोचे खूप चाहते असल्याचे सांगितले. आणि त्याच वेळी एक कथा आमच्याकडे खूप दिवस पडून आहे. मात्र, त्यासाठी आम्हाला विनोदाची अचूक जाण, टायमिंग असलेला असा अभिनेता हवा होता. तू या कथेला न्याय देऊ शकशील, असं आम्हाला वाटतंय. विचार करून बघ, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांना जर माझ्यावर विश्वास वाटतो आहे तर मी ही संधी का सोडायची?, असा विचार करून ‘किस किस को प्यार करूँ ’ या चित्रपटाला होकार दिला.
कपिल शर्मा