मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. अशाच एका ‘सेलिब्रिटी’ हे बिरुद मिरवणाऱ्या एका अभिनेत्याच्या आयुष्याबद्दलचे दोन टोकाचे दृष्टिकोन उलगडणारं ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नवं नाटक.

या अत्यंत वेगळ्या विषयावरील नाटकाची निर्मिती संतोष रत्नाकर गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे यांच्या ‘विप्लवा’ + ‘प्रवेश निर्मित’ केले असून या नाटकाचे सादरकर्ते संतोष रत्नाकर गुजराथी आहेत. लोकप्रिय अभिनेते सुमीत राघवन आणि क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.  ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ या नाटकाचं अनेक मराठी सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. या नाटकाचे मोजकेच प्रयोग सादर झाले असून त्या प्रयोगांना मान्यवरांनी विशेष प्रतिसाद दिल्याने आता हे नाटक सर्वसामान्य रसिकांसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 28 व 29 मार्च रोजी बोरीवली, दादर तसेच ६, १३ एप्रिल रोजी प्रभादेवी – दादर येथील नाट्यगृहांमध्ये या नाटकाचे प्रयोग जाहीर केले आहेत.

आजच्या काळाशी सुसंगत वेगळा विषय आणि नव्या पठडीतील सादरीकरण सामान्य प्रेक्षकालाही भुरळ घालणारं असून ते प्रत्येकाने पहावं म्हणजे एका सेलिब्रिटींचं काय आयुष्य असतं? आणि सामान्य प्रेक्षक त्यांच्याकडे कसं पाहतो? याचं झक्कास मिश्रण लेखक – दिग्दर्शकाने या नाटकात केले आहे. आजचं सोशल मीडियाचं जग कसं आहे? आणि त्याचा सर्वांवर होणारा परिणाम – दुष्परिणाम याचं यथार्थ दर्शन आपल्याला ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ पहायला मिळत आहे.