Priyanka Chopra, Nick Jonas बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजची ऑफर मिळाली. या सीरिजच्या निमित्ताने परदेशात गेलेली प्रियांका पाहता पाहता तिथल्या प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करु लागली. प्रियांकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती, तिचा पती निक जोनास त्याचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियांका-निकने लग्नगाठ बांधली.

निक जोनास हा लोकप्रिय अमेरिकन गायक असून, आपल्या भावांसोबत म्हणजेच जोए आणि केविन यांच्यासोबत ‘जोनास ब्रदर्स’ हा बँड सुरु केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. ‘जोनास ब्रदर्स’चा पहिला अल्बम ‘इट्स अबाउट टाइम’ फारसा गाजला नाही. पण, त्यानंतरच्या म्युझिक अल्बमला मात्र अनेकांनीच डोक्यावर उचलून धरलं. त्याचवेळी त्यांच्या लोकप्रियतेचा आकडा झपाट्याने वाढला. जोनास ब्रदर्सच्या लोकप्रियतेमध्ये डिस्ने चॅनलची महत्त्वाची भूमिका होती हे नाकारता येणार नाही.

जोनास ब्रदर्शनी कालांतराने वेगळ्या वाटा निवडत ते तिघंही (निक, जोए, केविन) यश संपादन करण्यासाठी पुढे मार्गस्थ झाले. निकही या वाटेवर बराच यशस्वी ठरला. असा हा अमेरिकन सेलिब्रिटी देली गर्लला डेट करत असल्याचं अमेरिकेतील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण कलाविश्वात या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं.

प्रियांका-निकमधील वयाचं अंतर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निकचं वय २६ वर्षे आहे. ‘पुरुष साथीदार वयाने मोठा असेल तर ते लोकांना चालतं. पण स्त्री वयाने मोठी असेल तर प्रश्न उपस्थित केले जातात. मुलगी वयाने लहान असेल आणि तिचा साथीदार वयाने मोठा असेल तर उलट लोकांना ते आवडतं. मग वयाने मोठी असलेली स्त्री का नाही चालत,’ असं सडेतोड उत्तर प्रियांकाने एका मुलाखतीत दिलं होतं.