मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत. नागराज मंजुळेंचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही पसंत पडत आहे. शिवाय या कार्यक्रमासाठी त्यांना चांगलं मानधनही मिळत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार नागराज यांना या सिझनसाठी दोन कोटी रुपये मिळत आहेत. या सिझनमध्ये एकूण ४५ एपिसोड असणार आहेत. मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी ‘कोण होणार करोडपती’च्या पर्वांचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर यांनी केलं होतं. मात्र यंदा एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी वाहिनीने नागराज मंजुळेंची निवड केली आहे.

हिंदीच्या तुलनेत मराठी कार्यक्रमांचं बजेट कमी असल्याने ‘कोण होणार करोडपती’च्या विजेत्याला मिळणारी रक्कमसुद्धा कमी आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण बनेगा करोडपती’च्या विजेत्याला ७ कोटींची रक्कम मिळते तर मराठीत ही रक्कम १ कोटी रुपये इतकीच आहे.