सोनम कपूरच्या लग्नावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना काही काळासाठी पूर्णविराम मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. श्रद्धा छायाचित्रकार रोहन श्रेष्ठासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं आहे. या चर्चांवर शक्ती कपूर यांनी त्यांची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही काळात श्रद्धा तिचा प्रियकर रोहन श्रेष्ठासोबत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रोहन श्रेष्ठा हा एक बॉलिवूड फोटोग्राफर आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसेच या दोघांनी २०१८पासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यासही सुरूवात केली. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या घरातल्यांना माहित आहे. मात्र अद्यापतरी या जोडीने लग्नाचा कोणताही निर्णय घेतला नाही, असं शक्ती कपूर यांनी सांगितलं आहे.

“श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाविषयी होत असलेल्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. या चर्चांना कोणताही आधार नाही. श्रद्धा एवढ्या लवकरच लग्न करणार नसून सध्या ती तिच्या करिअरवर लक्षकेंद्रीत करत आहे”, असं शक्ती यांनी सांगितलं.

पुढे ते असं म्हणतात, “यापूर्वीही श्रद्धाचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. श्रद्धा तिच्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टीही माझ्यासोबत शेअर करत असते. रोहनचे वडील आणि माझी चांगली मैत्री आहे. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणंही असतं. मात्र म्हणून श्रद्धा आणि रोहन लग्न करणार आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. श्रद्धा तिच्या लग्नाचा जो काही निर्णय घेईल त्यात ती घरच्यांची परवानगी नक्कीच घेईल”.

गेल्या वर्षभरात दीपिका- रणवीर, प्रियांका -निक जोनास, सोनम आनंद आहुजा ही जोडपी विवाहबंधनात अडकली. अशातच श्रद्धा कपूरही लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र ती तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. श्रद्धा लवकरच ‘छिछोरे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्यतिरिक्त दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात देखील ती झळकणार आहे. रेमो डिसूजाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातही श्रद्धा काम करणार आहे. तिच्या सोबत वरूण धवन देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.