अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिचा जीवनप्रवास बॉलिवूडपासून सुरु केला आणि आता ती एका लेखिकेच्या रुपात साऱ्यांसमोर येत आहे. याविषयी तिने अनेकवेळा तिची मत मांडली असून नुकत्याच एका झालेल्या कार्यक्रमाध्ये तीने तिच्या आईबाबत एक आश्चर्यकारक मत मांडलं आहे. ‘अभिनेत्री हेमा मालिनी मला आईच्या रुपात लाभल्या असत्या तर बरं झालं असतं’, असं ती म्हणाली.

ट्विंकलची आतापर्यंत दोन पुस्तक वाचकांच्या भेटीला आली असून तिच्या ‘पजामास आर फॉर गिविंग’ या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी तुझी आई डिंपल कपाडिया आणि नवरा अक्षय कुमार यांच्याबद्दल काय सांगशील असा प्रश्न दिग्दर्शक करण जोहरने विचारला होता. यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत हेमा मालिनी माझ्या आई हव्या होत्या अशी इच्छा तिने व्यक्त केली. ट्विंकलने तिचं हे तिसरं पुस्तक आई डिंपल कपाडियांना समर्पित केलं आहे.

‘आतापर्यंत मी जे काही यश संपादित केलं, त्या यशासाठी माझ्या आईने कधीच माझी पाठ थोपटली नाही. ती कायम माझ्या चुका शोधत राहिली. आजवर एकदाही तिने मला प्रोत्साहन दिलेलं नाही. मी जेव्हा माझा पहिला कॉलम प्रसिद्ध झाला होता. तेव्हा माझा कॉलम वाचलास का असं मी आईला फोन करुन विचारलं होतं. मात्र माझा कॉलम तर तिने वाचला नाहीच. पण आदल्या दिवशी पार्टीमध्ये माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यावर चर्चा करत राहिली’, असं ट्विंकल म्हणाली.

पुढे ती मजेशीर अंदाजात असंही म्हणाली, ‘डिंपल कपाडिया यांच्या जागी जर हेमा मालिनी आई म्हणून मला मिळाल्या असत्या तर बर झालं असतं. त्या अनेक वेळा त्यांच्या मुलींची साथ देताना दिसतात. केंट वॉटर प्युरिफायच्या जाहिरातीतही त्या मुलीबरोबर झळकल्या आहेत. जर त्या माझ्या आई असत्या तर आज मला एक वॉटर प्युरिफाय मोफत मिळाला असता’. दरम्यान, ट्विंकलचे आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित झाली असून ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘मिसेज फनीबोन’ ही त्यांच्या लोकप्रिय पुस्तकांची नावे आहेत.