सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या ‘कोचादैयान’ या बहुचर्चित चित्रपटाच्या संगीताने प्रसिद्धीनंतर अवघ्या काही तासातच ‘आय-ट्युन्स’वर धुमाकुळ घातला. काल रविवारी (९ मार्च) या चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा बॉलिवूड कलाकार शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसह अन्य स्टार मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाच्या संगीताने अनावरणानंतर काही काळातच ‘आय-ट्युन्स’वर भारतीय संगीत विभागात सर्वात वरचे स्थान पटकावले.

‘कोचादैयान’ चित्रपटाचे संगीत महान संगीतकार ए. आर. रहमान यांचे आहे. सोशल मीडिया साईट टि्वटरवरील ट्रेन्डींगमध्ये सामील होणारा ‘कोचादैयान’ हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.

‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करून बनविण्यात आलेला ‘कोचादैयान’ हा देशातील पहिलाच चित्रपट असून, जेम्स कॅमरॉनच्या ‘अवतार’ या हॉलिवूडपटाला भारताचे हे चोख उत्तर आहे. ‘कोचादैयान’ चित्रपटाद्वारे रजनीकांतची मुलगी सौंदर्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कोचादैयान’ हा भारतीय चित्रपटांसाठी मैलाचा दगड ठरण्याची तिला आशा आहे. ११ एप्रिलरोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात जॅकी श्रॉफसुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.