निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो तो विविध कारणांनी. त्याच्या चित्रपटांपासून ते अगदी त्याच्या प्रत्येक वक्तव्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. त्याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनवेळी तर तो बराच चर्चेत राहतो. सेलिब्रिटींच्या मुलाखती, करणच्या खुमासदार सूत्रसंचासनाची जोड आणि या कार्यक्रमातील रॅपिड फायर राऊंड हे या चॅट शो मधील महत्त्वाचे घटक असतात. करणसोबत गप्पा मारण्यासाठी त्याच्या या चॅट शो मध्ये येणाऱ्या सिलिब्रिटींना रॅपिड फायर या धम्माल खेळाअंतर्गत झटपट काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे देताना कलाकारांची उडणारी तारांबळ पाहण्याजोगी असते. पण, जर करणला त्याच्या कार्यक्रमात आलेल्या सेलिब्रिटींनी उलटसुलट प्रश्न विचारला तर काय होईल, जरा विचार करा.

गेल्या सीझनवेळी करणने त्याच्या अधिकृत ट्विटल हॅण्टलवरून सदर शोच्या ‘बिहाइण्ड द सिन्स’चा एक व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यात शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना करणला एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली होती. या सर्व प्रश्नांमध्ये आलिया भट्टने विचारलेला प्रश्न रंजक होता. कॉफी विथ करणच्या गेल्या सिझनच्या सुरुवातीला अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता शाहरुख खान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी आलियाने करणला प्रश्न केलेला की, तुला कोणासोबत लग्न करायला आवडेल, कोणाशी नाव जोडले गेले तर चालेल आणि कोणाचा जीव घ्यावासा वाटतो? यासाठी तिने करणला दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय बच्चन हे तीन पर्याय दिले होते. आलियाच्या प्रश्नाचे उत्तर देताना करण म्हणाला की, मी दीपिकाशी लग्न करेन तर ऐश्वर्याचा जीव घेईन. असे का, यामागचे कारण काय? असे आलिया आणि शाहरुखने त्याला विचारले असता तो म्हणाला की, मी आणि अभिषेक एकत्र मोठे झालो आहोत. त्यामुळे मी ऐश्वर्यासोबत तर जाऊ शकत नाही. म्हणून मग आमच्या कुटुंबातील संबंधांमुळे मला ऐश्वर्याचा जीव घ्यावा लागेल.

करणने त्याच्या ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोसंबंधितसुद्धा काही खुसाला केला आहे. पुस्तकात नमूद केल्यानुसार ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच पर्वाविषयी सांगताना करणने लिहलेय की, ‘कॉफी विथ करण’ या माझ्या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी फक्त एकाच सेलिब्रिटीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची कल्पना दिली होती. तो सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता संजय दत्त. त्यावेळी संजय दत्त अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत माझ्या कार्यक्रमाला येणार होते. मला माहित होते की सुश्मिता माझ्या प्रश्नांची झटपट उत्तरं देणार आणि तिच्या तुलनेत संजय दत्त काहीसा कमी पडणार. त्याचे कारण असे की संजय दत्त त्यावेळी काहीसा संकुचितही होता. त्या एकमेव कारणासाठीच मी त्याला रॅपिड फायरसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची आधीच कल्पना दिली होती आणि संजय दत्तने त्यावेळी रॅपिड फायरमध्ये बाजी मारत बक्षिसही मिळवले होते’.