बॉलिवूड वर्तुळ आणि टेलिव्हीजन विश्वाला जोडणारा सध्याचा एक दुवा म्हणजे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर. सध्या करण जोहर चर्चेत आहे तो म्हणचे त्याच्या बहुचर्चित चॅट शो मुळे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो मध्ये बॉलिवूड विश्वातील विविध कलाकार हजेरी लावून गप्पांची मैफल रंगवतात. या कार्यक्रमातील गप्पांना जोड असते ती म्हणजे करणच्या शो मध्ये दिल्या जाणाऱ्या कॉफीची. या कार्यक्रमाचे प्रदर्शित झालेले काही भाग सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या पर्वामध्ये लवकरच सर्वांच्या ओळखीतील एक चेहरा हजेरी लावणार आहे. तो ओळखीचा चेहरा म्हणजे विनोदवीर कपिल शर्मा.

वाचा: करणने शाहरुखचे बाथरुम सिक्रेट केले उघड

विनोदाला एका वेगळाच दर्जा देणाऱ्या कपिल शर्माने मिळवलेली लोकप्रियता आणि त्याची खुमासदार विनोदी शैली पाहता कपिलची या कार्यक्रमामध्ये वर्णी लागली आहे असेच म्हणावे लागेल. कपिलने या कार्यक्रमाच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले हे सांगणारा एक फोटो त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच पोस्ट केला. या फोटोसह त्यांनी एक कॅप्शनही लिहिले होते. ज्यामध्ये त्याने जिंकलेल्या बक्षीसासाठी करण जोहरचे आभार मानले आहेत. ‘मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे’, असेही कपिलने म्हटले.

नेहमीच विविध कलाकारांची खिल्ली उडवणारा आणि त्यांच्यावर फिरकीच्या प्रश्नांचा मारा करणारा कपिल पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये येत आहे. त्यामुळे त्या त्या क्षणाच्या आणि प्रसंगांच्या अनुशंगाने विनोद करणाऱ्या या विनोदवीरासमोर करण कोणते प्रश्न सादर करणार आणि कपिल त्यांचा कसा सामना करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आतापर्यंत ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या पर्वामध्ये अभिनेता शाहरुख खान, आलिया भट्ट, अर्जून कपूर, वरुण धवन, ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार या कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्या गमतीशीर गप्पांचा नजराणाही करणच्या या कार्यक्रमातून लवकरच पाहायला मिळणार आहे. पण, सध्यातरी कपिल आणि करणमध्ये काय गप्पा रंगतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.