निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे. पण, करण आणखी एका कार्यक्रमामुळेही नेहमीच चर्चावर्तुळांमध्ये स्थान मिळवितो. आणि ते कारण म्हणजे त्याचे खुमासदार सूत्रसंचालन. सध्या स्टार वर्ल्ड या वाहिनीवर करणचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच गाजत आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटींनी आतापर्यंत या कार्यक्रमात हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. त्यानंतर आता करणसोबत कॉफी पिण्यासाठी त्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती ती बॉलिवूडच्या गॉसिप गर्ल्स सोनम कपूर आणि करिना कपूर यांनी. करिना आणि सोनम या कार्यक्रमात येणार असल्यामुळे सोशल मीडियावरही अनेकांनी हा विषय उचलून धरला होता. कार्यक्रमात कलाकारांना काही वेळा करणच्या कठीण प्रश्नांचा देखील सामना करावा लागतो. सोनम आणि करिनासोबतही असे काही किस्से प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

करणने सदर शोमध्ये सोनम कधी तिचा पहिला सहकलाकार असलेल्या रणबीर कपूरला डेट करेल का? असा प्रश्न केला. तेव्हा सोनमने काही बोलण्या आधीच करिनाने उत्तर दिले की, सोनमला आमच्या वहिनीच्या रुपात पाहण्यासाठी करिष्मा खूप उत्सुक आहे. त्यानंतर सोनम म्हणाली की, मी रणबीरला कधी खूश ठेवू शकेन असे मला वाटत नाही. पण आम्ही दोघं चांगले मित्र बनू शकतो. करिना आई होण्यापूर्वी या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून निमंत्रित करुन करण बॉलिवूड कलाकारांकडून अनेक गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न करत असतो.

संजय लीला भन्साली याच्या साँवरिया या चित्रपटातून रणबीर आणि सोनमने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यावेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या. तसेच, रणबीरच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींमध्ये दीपिका, कतरिना यांच्यासह बरेचदा सोनमचेही नाव घेतले जाते. दरम्यान, संजय दत्त याच्यावर आधारित राज कुमार हिराणीच्या चित्रपटात रणबीर आणि सोनम लवकरच एकत्र दिसणार आहेत. तसेच, विरे दी वेडिंग या चित्रपटात सोनम कपूर आणि करिना कपूर खान एकत्र दिसतील.