‘तांडव’ वेबसीरिजचे निर्माते आणि कलाकारांना कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वेगवेगळया राज्यांमध्ये वेब सीरिजचे निर्माते आणि कलाकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कलाकारांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यावर आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. अली अब्बास झफर यांनी दिग्दर्शित केलेली ‘तांडव’ वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. धार्मिक भावना दुखावल्यामुळे ही वेब सीरिज सध्या वादाच्या केंद्र स्थानी आहे.

वेब सीरिजमध्ये पात्राने जे विचार व्यक्त केलेत, त्याचा कलाकाराशी संबंध जोडू नका, हा युक्तीवाद न्यायाधीश एम.आर.शाह यांनी बुधवारी फेटाळून लावला. “स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं. तुम्ही धार्मिक भावना दुखावू शकत नाही” असे न्यायाधीश शाह म्हणाले.

आणखी वाचा- ‘तांडव’ला दिलासा नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका

सर्वोच्च न्यायालयाच्या या मतावर कोंकणाने टि्वटरवर म्हटले आहे की, “या वेब सीरिजमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी स्क्रिप्ट वाचून कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली होती. आता सर्वच कास्ट आणि क्रू ला अटक करा.”

अभिनेत्री गौहार खानने तांडवमध्ये मैथिलीची व्यक्तीरेखा साकारली आहे. तिने इमोजीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढे लोक पडद्यावर मारेकऱ्याची भूमिका साकारतील, त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवला जाईल. त्यावेळी त्यांनी स्क्रिप्ट वाचलेली असेल हे टि्वट गौहार खानने रिटि्वट केले आहे.