बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांना धक्का बसला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली होती. पण काही कलाकार असे आहेत ज्यांनी सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आता या ट्रोलर्सला अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या बहिणीने चांगलेच सुनावले आहे.
क्रिती सेनॉनची बहिण नुपूर सेनॉने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. ‘कालपासून अचानक लोकं सोशल मीडियावर मेंटल हेल्थ विषयी बोलू लागले. ज्या लोकांना धक्का बसला आहे तसेच काही लोकं दु:खी आहेत अशा लोकांना ट्विट आणि मेसेज करत तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट का केली नाही असे विचारत आहात’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
‘तुम्ही एक पोस्ट ही करु शकत नाही? तुम्ही एक प्रतिक्रियाही दिली नाही. असे मेसेज मला सतत येत आहेत. तुमची परवानगी असेल तर मी रडू शकते का?’ असे नुपूरने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
रविवारी १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याला ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूरच्या मालिकेन ओळख निर्माण करुन दिली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 7:50 pm