करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या गरीबांना सरकार धान्याचे वाटप करत आहे. मात्र या उपाययोजना पुरेशा नाहीत. या पेक्षा जास्त मदत कॅनडा सरकार त्यांच्या लोकांसाठी करत असल्याचा दावा अभिनेता कमाल आर खानने केला आहे. त्याने अक्षय कुमारचे नाव घेत केंद्र सरकारवर टोला लगावला आहे.

नेमक काय म्हणाला कमाल खान?

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूवरुन भारत सरकारवर निशाणा साधला आहे. “अक्षय कुमारचा देश कॅनडा सर्वात बेस्ट आहे. तेथील सरकार देशातील प्रत्येक नागरीकाला दोन हजार डॉलरची मदत करत आहे. ही मदत पुढच्या चार महिन्यांसाठी आहे. तसेच भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना ५०० डॉलरची मदत केली जात आहे. मात्र आपलं सरकार काय करतय तर केवळ भाषण आणि राशन देत आहे.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमारने आतापर्यंत २५ कोटी रुपयांची मदत करोनाग्रस्तांसाठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काही जण कमाल खानवर टीका देखील करत आहे.