एप्रिल महिन्याच्या शेवटचे दोन दिवस फक्त बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण देशासाठी दु:खद होते. २९ आणि ३० एप्रिल रोजी बॉलिवूडमधील दोन कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वजण इरफान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेता कमाल राशिद खानने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे तो चर्चेत आहे.

केआरकेने ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक ट्विट केले होते. ‘ऋषी कपूर यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मी त्यांना इतकच सांगू इच्छितो की, सर लवकर बरे होऊन घरी परत या. निघून जाऊ नका, कारण २-३ दिवसांमध्ये दारुची दुकाने उघडणार आहेत’ असे त्याने म्हटले होते.

 

 

त्यानंतर त्याने केलेले ट्विट चर्चेत होते. ‘करोना काही प्रसिद्ध लोकांना घेतल्याशिवाय जाणार नाही असे मी काही दिवासांपूर्वीच म्हटले होत. त्यावेळी मी लोकांची नावे सांगितली नाही कारण लोकांनी मला सुनावले असते. पण मला माहित होते इरफान आणि ऋषी जगाचा निरोप घेणार. हे देखील माहित आहे की पुढचा नंबर कोणाचा आहे’ असे केआरकेने ट्विटमध्ये म्हटले होते.

केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर #SuspendKRK ट्रेंड होऊ लागला होता. काही वेळातच त्याने ते ट्विट डिलिट केले.