प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. तो अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप देखील केले जातात. परंतु गोविंदा आणि कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून दोघं एकमेंकासमोरही आलेले नाहीत. किंबहूना एखाद्या कार्यक्रमात गोविंदा येणार हे कळताच कृष्णा त्या ठिकाणी जाणं टाळतो. परंतु आता हे मतभेद कृष्णाला संपवायचे आहेत. अन् यासाठी त्याला कपिल शर्माने मदत करावी अशी विनंती तो करतोय.
अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने मामासोबत असलेल्या मतभेदांवर भाष्य केलं. तो म्हणाला, “चिची मामासोबत असलेले मतभेद आता मला संपवायचे आहेत. एका गैरसमजुतीमुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून मी मामासोबत माझं कुठलंही संभाषण झालेलं नाही. मामा कपिल शर्मा शोमध्ये आला तेव्हा मी गैरहजर होतो. खरं तर त्या शोमध्ये मला सुपरस्टार गोविंदाला ट्रिब्यूट द्यायचा होता. पण माझा एखादा विनोद मामाला आवडला नाही तर उगाच आणखी मतभेद होतील त्यामुळे मी शोमध्ये गैरहजर राहिलो. पण आता मी या भांडणाला कंटाळलो आहे. मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. मला वाटतं कपिल शर्मा यासाठी मला मदत करु शकेल.”
अवश्य पाहा – ‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप
कृष्णा अभिषेक एक प्रसिद्ध अभिनेता आहे. २००२ साली ‘ये कैसी मोहब्बत’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पूजा चरण मा बाप के’, ‘देवरजी’, ‘काहे बासुरिया बजाऐ’, ‘हमार इज्जत’ यांसारख्या काही भोजपुरी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. ‘कॉमेडी सर्कस’ या टीव्ही शोमुळे कृष्णाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘बोल बच्चन’, ‘एन्टरटेन्मेंट’, ‘क्या कूल है हम’ यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. सध्या कृष्णा एक लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 1:08 pm